राजस्थानातील दाल-बाटी, चुरमा थाळी झाली मराठमोळी, श्रावणात भंडाऱ्यात भाविकांना मेजवानी
By प्रशांत तेलवाडकर | Published: August 26, 2023 08:29 PM2023-08-26T20:29:12+5:302023-08-26T20:30:58+5:30
श्रावण आला... भंडाऱ्यात दाल, बाटी, चुरमा अन् गावरान तुपाची धारेची मेजवानी
छत्रपती संभाजीनगर : श्रावणात येणारे कृष्ण जन्माष्टमी असो वा दहीहंडी, यानंतरचे गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सव असो सर्वत्र भंडाऱ्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. यात स्वादिष्ट दाल-बाटी, चुरमा अन् त्यावर गावरान तुपाची धार’ असा पोट तृप्त करून टाकणारा भंडारा दिला जातो.
भंडाऱ्याचे वेध
मंदिर, मंगल कार्यालय, सामाजिक हॉल, गोगाबाबा टेकडी, हनुमान टेकडी, साई टेकडी किंवा अन्य निसर्गरम्य वातावरण जिथे भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. तिथे ‘दाल, बाटी, चुरमा’ हमखास असतो. यामुळे सर्वांना भंडाऱ्याचे वेध लागले आहेत.
गोविंदा पथक दाल-बाटी खाऊनच करतात श्रमपरिहार
श्रीकृष्ण जन्माष्टमी व नंतर दहीहंडीसाठी शहरातील गोविंदा पथक महिनाभर आधीच प्रॅक्टिस करीत असतात. दहहंडी जिंको किंवा हारो, पण नंतर श्रमपरिहारासाठी भंडारा केला जातो. यात ‘दाल-बाटी’चाच बेत असतो. एका भंडाऱ्यात हजारो लोक जेवतात. यासाठी वर्षभर गोविंदा वाट पाहत असतात.
- रोशन पिपाडा, जय भद्रा गोविंदा पथक
दर महिन्याला दहा हजार थाली
शहरातील काही हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये वर्षभर ‘दाल-बाटी’ मिळत असते. काही हॉटेलमध्ये गुरुवारी किंवा रविवार असा आठवड्यातील एक दिवस फक्त ‘दाल-बाटी’साठीच राखीव असतो. साधारणत: २०० ते ३५० रुपये दरम्यान दाल-बाटीची थाली मिळते. अनेकजण पार्सलही घेऊन जातात. दाल-बाटीसाठी शहरातील काही हॉटेल प्रसिद्ध आहेत. शहरात दर महिन्याला ८ हजार ते १० हजार दाल-बाटीच्या थालीचा खप असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.
दाल-बाटीत पाच प्रकार
शहरात पाच प्रकारची दाल-बाटी बनविली जाते. एक गोवऱ्यावर भाजलेली बाटी, मसाला दाल-बाटी, इंदोरी दाल-बाटी, साधी तेलातील दाल-बाटी, जोधपुरी दाल-बाटी. छत्रपती संभाजीनगरात गोवऱ्यावर भाजलेली बाटी किंवा तळलेली दाल-बाटी जास्त पसंत केले जाते. डाळीत पाच डाळींचा वापर केला जातो.
- अजय मुथा, केटरर्स
राजस्थानातील दाल-बाटी बनली मराठमोळी
१) दाल-बाटी हे राजस्थानमधील पारंपरिक खाद्यपदार्थ आहे.
२) बाटीचा इतिहास १३०० वर्षांपूर्वीचा आहे.
३) सैनिक युद्धाला जाण्यापूर्वी वाळवंटात पीठाचे गोळे करून वाळू ठेवत.
४) दिवसभर उन्हात व वाळूत तापून भाजून त्याची बाटी तयार होत.
५) युद्धावरून सायंकाळी मुक्कामस्थळी पोहोचल्यावर हीच बाटी सैनिक खात असत.
६) राजस्थानातील दाल-बाटी आता मराठमोळी बनली आहे.