८५ मुलांना मिळाले ८९ लाखांचे अनुदान; राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेचा लाभ

By राम शिनगारे | Published: December 15, 2023 02:01 PM2023-12-15T14:01:50+5:302023-12-15T14:02:50+5:30

शालेय शिक्षण विभागातर्फे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येते.

Rajiv Gandhi Student Accident Relief Scheme: 85 children received subsidy of 89 lakhs in Chhatrapati Sambhajinagar | ८५ मुलांना मिळाले ८९ लाखांचे अनुदान; राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेचा लाभ

८५ मुलांना मिळाले ८९ लाखांचे अनुदान; राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेचा लाभ

छत्रपती संभाजीनगर : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत ८५ विद्यार्थ्यांना मंजूर केलेला ८९ लाख १७ हजार ९७२ रुपये निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा परिषदेला हा निधी प्राप्त झाल्यानंतर संबंधित विद्यार्थी, नातेवाइकांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आल्याची माहिती योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी अरुणा भूमकर यांनी दिली.

शालेय शिक्षण विभागातर्फे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येते. यात विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला असेल तर १ लाख ५० हजार रुपये, अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास १ लाख ते ७५ हजार, अपघातात जखमीवर शस्त्रक्रिया करावी लागल्यास हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपये, विद्यार्थी आजारी पडून, सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास १ लाख ५० हजार रुपये अनुदान देण्यात येते. ही योजना पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या मुला-मुलींना लागू आहे.

घटनेनंतर अनुदान मिळविण्यासाठी संबंधित विद्यार्थी अथवा नातेवाइकांना मुख्याध्यापकांमार्फत शिक्षणाधिकारी, योजना विभागाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत मंजुरीसाठी ठेवला जातो. या समितीत सीईओ, पोलिस अधीक्षक, प्राथमिक, माध्यमिक व योजना विभागाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार शासनाकडे अनुदानाची मागणी केली जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८५ विद्यार्थ्यांच्या अनुदानासाठी ८९ लाख १७ हजार ९७२ एवढा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. त्यानुसार या निधीचे वितरण संबंधितांच्या बँक खात्यात गुरुवारी करण्यात आले. चार विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरण होऊ शकले नाही, अशी माहितीही शिक्षणाधिकारी भूमकर यांनी दिली. तसेच, सध्या योजना विभागाकडे ३५ विद्यार्थ्यांचे अनुदानासाठी प्रस्ताव नव्याने दाखल झाले आहेत.

अनुदानाचे वितरण झाले
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत ८५ विद्यार्थ्यांसाठी ८९ लाख १७ हजार ९७२ रुपयांचा निधी राज्य शासनाने उपलब्ध केला आहे. या निधीचे संबंधितांच्या बँक खात्यात गुरुवारी वितरण करण्यात आले. केवळ ४ जणांच्या बँकेतील तांत्रिक अडचणींमुळे वितरण होऊ शकले नाही.
- अरुणा भूमकर, शिक्षणाधिकारी, योजना विभाग.

Web Title: Rajiv Gandhi Student Accident Relief Scheme: 85 children received subsidy of 89 lakhs in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.