राजेंद्र जैनने वितळविण्यासाठी कारागिराला दिले ३२ किलो सोने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 07:25 PM2019-07-10T19:25:55+5:302019-07-10T19:28:24+5:30
सोने गाळणाऱ्या परप्रांतीय कारागिराने दिली माहिती
औरंगाबाद : राजेंद्र जैन याने थोडेथोडे करून ३२ किलो सोने जमा केल्याची माहिती जडगाववाला ज्वेलर्सकडील सोने गाळणाऱ्या परप्रांतीय कारागिराने चौकशीदरम्यान आर्थिक गुन्हे शाखेला दिली. राजेद्र ऊर्फ राजू सेठिया आणि शहरातील इतरही जवळपास ७ सराफ पोलिसांच्या रडारवर आहेत.
मुथूट फायनान्समध्ये तारण ठेवलेले २५ किलो सोने सोडून घेण्यासाठी जडगाववाला राजू सेठियाने २२ हजार रुपये तोळे यानुसार सोने खरेदी केले. या व्यवहारात सेठियाला जवळपास ८० ते ९० लाखांचा फायदा झाला असावा. सोडून आणलेले सोने त्याने वितळून टाकल्याचे तपासात समोर आले. वामन हरी पेठे ज्वेलर्सचा अधिकृत ठसा असलेले सोने जर वितळविले जात असेल तर त्याविषयी स्थानिक पोलिसांना अधिकृत माहिती देणे आवश्यक होते, परंतु पोलिसांना कोणतीही खबर देण्यात आलेली नाही.
अजून जवळपास ७ सराफा पोलिसांच्या रडारवर
इतर अन्य कारागिरांनी असे सोने वितळून दिले काय, तसेच सोने सोडवून घेण्यास एवढी मोठी रक्कम देण्यात कोणाचा हात आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. जैन याने अजून किती लोकांना सोने दिले आहे, त्यानुसार ७ सराफा पोलिसांच्या रडारवर आहेत. आरोपी जैनला पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केल्याने हळूहळू एकएक कोडे उलगडत आहे, असे पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सांगितले.