राजूर ग्रा.पं. भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 01:05 AM2017-07-25T01:05:56+5:302017-07-25T01:08:20+5:30
राजूर : येथील ग्रामपंचायत अंतर्गत आदर्श सांसद ग्राम योजनेच्या विविध विकास कामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी भोकरदनच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे लेखी पत्र दिले
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : येथील ग्रामपंचायत अंतर्गत आदर्श सांसद ग्राम योजनेच्या विविध विकास कामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी केलेल्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भोकरदनच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे लेखी पत्र दिले असून सात दिवसांत चौकशी अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह कार्यालयाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी सुरू झाल्याने ग्रामपंचायत क्षेत्रात खळबळ उडाली असून ग्रामस्थांचे लक्ष चौकशीत काय निष्पन्न होते याकडे लागले आहे.
राजूरचा आदर्श सांसद ग्राम योजनेत समावेश झालेला होता. त्या अनुषंगाने राजूरला विविध खात्यामार्फत विकास कामे करण्यात आली. यामधे ग्रामविकास अधिकारी आणि तत्कालीन सरपंचाने बाजार ओट्याचे जुनेच काम नवन्ीा दाखवून बिले उचलणे, शौचालयाच्या कामात अफरातफर, गावांतर्गत भारत निर्माण योजनेतून झालेली पाईपलाईन त्याच ठिकाणी दुसऱ्यांदा पाईपलाईन दाखवून बिले उचलणे, बॉण्ड पेपरवर फेरफार करून महसूल बुडवणे, बाजार हर्रासीचे पैसे न भरल्याचे कारण दाखवून मर्जीतल्या गुत्तेदाराला हर्रासीचा कंत्राट देणे, खोटे बिले घेवून दुकानदाराला धनादेश देणे आदी राजूर येथील दत्तात्रय गंगाराम पुंगळे यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी जालना यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केले होते.
यासंदर्भात लोकमतमधून वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. दत्तात्रय पुंगळे यांनी ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे अनेकवेळा ग्रामपंचायत खर्चाची माहिती मागितली होती. मात्र ते देत नसल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी भोकरदन यांना पत्राव्दारे आदेश देऊन सदर प्रकरणाची विस्तार अधिकारी (पंचायत) यांच्यामार्फत चौकशी करून सात दिवसांच्या आत चौकशी अहवाल आपले स्वयंस्पष्ट अभिप्रायासह सादर करण्याचे आदेश दिले आहेत.