राजुरेश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा
By Admin | Published: January 31, 2017 11:34 PM2017-01-31T23:34:51+5:302017-01-31T23:38:28+5:30
राजूर : राजुरेश्वर महागणपतीचा जन्मोत्सव सोहळा मंगळवार दुपारी उत्साहात साजरा करण्यात आला.
राजूर : मंत्राचा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी व सनई चौघड्यांच्या मंगलवाद्यात मराठवाड्याचे आराध्य दैवत राजुरेश्वर महागणपतीचा जन्मोत्सव सोहळा मंगळवार दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करून उत्साहात साजरा करण्यात आला. तर काला कीर्तन व महाप्रसादाने हरिनाम सप्ताहाचा समारोप झाला.
जन्मसोहळ्यानिमित्त जिल्हाधिकारी जोंधळे, तहसीलदार तथा गणपती संस्थानचे अध्यक्ष रूपा चित्रक व स्थानिक विश्वस्तांच्या हस्ते मंत्रोच्चारात सकाळी ९ वाजता श्रीस महापूजा, अभिषेक करून तेजोमय श्रीच्या मूर्तीस वस्त्रालंकार चढविण्यात आले. १२ वाजता महाआरती होऊन फटाक्यांची आतषबाजी व सनई चौघड्यांच्या निनादाने साजरा झालेल्या श्री जन्म सोहळ्यातील अदभुत शक्तीचा साऱ्या गणेश भक्तांनी अनुभव घेतला.
दरम्यान, गेल्या सप्ताहभरात मंदिराच्या पायथ्याशी सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाचा समारोप ह.भ.प. दयानंद महाराज सेलगावकर, निर्मलाताई दानवे, ह.भ.प.भीमराव महाराज दळवी, खडेश्वरी बाबा व सप्ताह समितीचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांच्या काल्याच्या कीर्तनाने समारोप करण्यात आला. समारोपानंतर १११ क्ंिवटल अन्नदानाचा भाविकांनी लाभ घेतला. (वार्ताहर)