राकाँला आयते कोलीत
By Admin | Published: March 17, 2017 11:58 PM2017-03-17T23:58:12+5:302017-03-17T23:58:47+5:30
बीड : गेवराई पंचायत समितीत शिवसेनेचे सहकार्य झुगारून भाजपने सत्ता तर गमावलीच; शिवाय जिल्हा परिषदेत हातातोंडाशी आलेला सत्तेचा घासही राष्ट्रवादीच्या सोयीचा करुन आयते कोलीत दिले आहे.
बीड : गेवराई पंचायत समितीत शिवसेनेचे सहकार्य झुगारून भाजपने सत्ता तर गमावलीच; शिवाय जिल्हा परिषदेत हातातोंडाशी आलेला सत्तेचा घासही राष्ट्रवादीच्या सोयीचा करुन आयते कोलीत दिले आहे. आ. लक्ष्मण पवारांमुळे दुखावलेल्या माजी मंत्री बदामरावांना राष्ट्रवादीने बरोबर हेरले आहे. दुसरीकडे काकू- नाना आघाडीला पंचायत समितीत राष्ट्रवादीने पाठिंबा दिला नाही. मात्र, बारामतीची वाट ‘सेफ’ ठेवण्यासाठी संदीप क्षीरसागरांनी अजित पवारांची भेट घेऊन जि.प. मध्ये अडचणीत असलेल्या राष्ट्रवादीला टेकू देण्याचे संकेत देऊन काकांना पुन्हा शह देण्यासाठी नवा डाव टाकला आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड २१ मार्च रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. शिवसेनेच्या आश्रयाला असलेले माजी मंत्री बदामराव पंडित व काकू- नाना आघाडीच्या माध्यमातून बंड करणारे संदीप क्षीरसागर यांनी गुरुवारी अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला आहे. बंद दाराआड नेमकी काय खलबते झाली? याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. बीड पंचायत समितीत राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी थेट प्रदेश कार्यालयाकडून ‘व्हिप’ आणून संदीप क्षीरसागर यांनी आपण राष्ट्रवादीपासून पूर्णपणे वेगळे झालेलो नाही हे दाखवून दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला जि.प. मध्ये सत्ता स्थापनेसाठी सध्या अवघ्या पाच सदस्यांच्या मदतीची निकड आहे. काँग्रेसचे तीन सदस्यांसोबत आघाडीचा निर्णय पूर्वीच झालेला आहे. त्यामुळे केवळ तीन सदस्य कमी पडतात. शिवसेनेचे चार व काकू- नाना आघाडीचे तीन सदस्य असे दोन पर्याय राष्ट्रवादीसमोर आहेत. गेवराई पंचायत समिती निवडणुकीत भाजपने सेनेची मदत घेतली असती तर युती सत्तास्थानी पोहोचली असती; परंतु आ. लक्ष्मण पवार यांनी दोन्ही पंडितांशी तडजोड करणे टाळले. त्यामुळे बदामरावांनी राष्ट्रवादीच्या आ. अमरसिंह पंडित यांची मदत घेऊन पंचायत समितीची सत्ता काबीज केली. शिवाय मतदारसंघात ‘वजन’ कायम असल्याचेही सिद्ध करुन दाखवले आहे. उल्लेखनीय म्हणजे आठवडाभरापूर्वीच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आ. पवार यांनी माजी मंत्री बदामराव पंडित यांच्यासोबत युती केली होती. मात्र, या दोघांचाही आ. अमरसिंह पंडितांसमोर निभाव लागला नाही.
राष्ट्रवादीतील दुहीचा फायदा उचलत शिवसेना व शिवसंग्रामच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या ‘लाल दिव्या’ला गवसणी घालण्याची चालून आलेल्या संधीपासून भाजप दूर जात आहे. भाजपकडे हक्काचे १९ सदस्य आहेत. शिवसंग्रामचे तीन, सेनेचे चार व एक अपक्ष असे मिळून २७ सदस्यांची गोळाबेरीज होते. आणखी तीन सदस्यांना खेचून भाजपही सत्तेवर दावा करु शकत होता. मात्र, बदामराव पंडित दुरावल्याने भाजपचे पाय खोलात गेले आहेत.