रक्षाबंधन : कोरोनाने कोणाचा भाऊ, तर कोणाची बहीण रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 01:22 PM2020-08-03T13:22:30+5:302020-08-03T16:58:50+5:30
ऐन रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाही अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले.
औरंगाबाद : बहीण-भावाचे नाते सांगणारा सण म्हणजे ‘रक्षाबंधन.’ या दिवशी भाऊ बहिणीकडे ओवाळणीसाठी जात असतो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे कोणाचा भाऊ रुग्णालयात आहे, तर कोणाची बहीण. मात्र, कोरोनावर मात करून बहिणीकडून राखी बांधून घेणार, भावाला ओवाळणार, असा विश्वास भाऊ-बहिणींनी व्यक्त केला.
जिल्ह्यात ३ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात कोणाची बहीण आहे, कोणाचा भाऊ तर काही रुग्णालयात भाऊ-बहिण दोघे आहेत. याशिवाय ऐन रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाही अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. त्यांना उपचारासाठी घाटीत, जिल्हा रुग्णालयात, मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये भरती व्हावे लागले. रक्षाबंधननिमित्त जेथे अनेकांना बहिणीकडून ओवाळून घेण्याचे, राखी बांधून घेण्याचे वेध लागले आहेत; परंतु या सणाच्या दिवशीच रुग्णालयात थांबण्याची वेळही अनेकांवर ओढावली.
बहीण भावाला राखी बांधून भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुख-शांतीसाठी प्रार्थना करते. तसेच, यानिमित्ताने बहिणीच्या रक्षणाचे वचन भावाकडून दिले जाते; परंतु आज नाही तर उद्या उपचार घेऊन घरी परतणार आहेच. तेव्हा हा सण साजरा करू, अशा भावना रुग्णांनी व्यक्त केल्या.
रुग्णालयात रुग्णांसोबत रक्षाबंधन साजरा करण्याच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालय, घाटी रुग्णालयात कर्मचा-यांकडूनही नियोजन केले जात आहे.
पूर्वसंध्येला परतले घरी : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला कोरोनावर उपचार घेऊन घाटी, कोविड केअर सेंटरमधून विविध भागांतील रुग्ण घरी परतले. रक्षाबंधनासाठी भाऊ, बहीण घरी परतले, याचा आनंदही अनेकांना मिळाला.