वाळूज महानगर सिडकोत महिलांचा जलकुंभावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:49 PM2019-04-20T23:49:09+5:302019-04-20T23:49:23+5:30
महिलांनी शनिवारी सिडको जलकुंभार मोर्चा काढून पाणी देण्याची मागणी केली. महिलांचे रौद्र रुप पाहून कर्मचारी टँकरने पाणी देवून महिलांची कशीबशी समजूत घातली.
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात सध्या पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. आठवड्यातून एकदा तेही कमी दाबाने पाणी मिळत असल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. संतप्त महिलांनी शनिवारी सिडको जलकुंभार मोर्चा काढून पाणी देण्याची मागणी केली. महिलांचे रौद्र रुप पाहून कर्मचारी टँकरने पाणी देवून महिलांची कशीबशी समजूत घातली. मात्र, यावेळी नियमित पाणी दिले तरच मतदान करु अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय रहिवाशांनी घेतला.
सिडको वाळूज महानगरातील एमआयजी व एलआयजी भागात पाण्याची गंभीर स्थिती आहे. अनेकवेळा मागणी करुनही वेळेवर पाणी मिळत नसल्याने महिलांनी शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास थेट सिडकोच्या जलकुंभावर मोर्चा काढला. महिला जलकुंभार धडकल्याची माहिती मिळताच सिडको अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने टँकरने पाणी देण्याचे आश्वासन दिले. मात्र, महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. अखेर कर्मचाºयांनी पाण्याचा टँकर देत महिलांची कशीबशी समजूत काढत शांत केले. पाण्याचा टँकर घेवूनच महिला माघारी परतल्या. यावेळी हसन शेख, महेश निकम, तुषार वडकते, प्रदीप गाडे, सचिन तांबे, ओमकार देशमुख, कविता आदीक, संगीता तिगोटे, अनिता मिठे, सरिता खोमणे, मीरा नाटकर, रेखा देशमुख, मनिषा चव्हाण, राधा भवर, अलका साळुंके, शोभा वाघ, मनिषा सैदाणे, रुख्मिणी तांबे, लता जाधव, अनिता मिठे, किरण घायवट, मंगल वानरे, वर्षा वानरे, मंगल आमलापुरे प्रतिभा पवार, कांता जाधव, शीला लोखंडे आदींची उपस्थिती होती.
चार दिवसांआड हवाय पाणी पुरवठा
एमआयजी भागाला सुरळित पाणी पुरवठा केला जात नाही. आठवड्यातून एकदा पाणी मिळते तेही कमी दाबाने. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. याविषयी अनेकवेळा सांगूनही प्रशासन याकडे लक्ष देत नाही. सिडको प्रशासनाने चार दिवसांआड नियमित सुरळित पाणीपुरवठा केला नाही तर आम्ही येणाºया निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.