पाणी बचतीचा संदेश देत काढणार रॅली
By Admin | Published: February 18, 2016 11:35 PM2016-02-18T23:35:12+5:302016-02-18T23:45:01+5:30
परभणी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पाणी, वीज बचत गटाच्या वतीने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीचा संदेश देत जनजागृती रॅली काढली जाणार
परभणी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पाणी, वीज बचत गटाच्या वतीने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीचा संदेश देत जनजागृती रॅली काढली जाणार असल्याची माहिती बचतगटाचे संस्थापक अध्यक्ष रणजीत कारेगावकर यांनी दिली.
या संदर्भाने आयोजित पत्रकार परिषदेत कारेगावकर यांनी सांगितले, शहरातील इलेक्ट्रीशियन, प्लंबर व मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी केली जाणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता आ.डॉ.राहुल पाटील, नंदकुमार आवचार, कॉ.किर्तीकुमार बुरांडे यांच्या उपस्थितीत रॅलीचे उद्घाटन होईल. या रॅलीतून पाणीप्रश्नासह समाजातील विविध प्रश्नांवर जनजागरण केले जाणार आहे.
तसेच २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अग्रवाल मंगल कार्यालयात व्याख्यानाचे आयोजन केले आहे. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, कर्तृत्व, प्रचार, प्रसारामध्ये युवकांचे योगदान या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या पत्रकार परिषदेस शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अशोक चांदणे, उपाध्यक्ष बाळासाहेब शिंगारे, विष्णू म्हेत्रे, व्यंकटेश येरावार, बंडू मगर, मंचक दुधाटे, बाळासाहेब शिनगारे, कैलास बोबडे, मदन बोबडे, अशोक दळवी आदींची उपस्थिती होती.
झरी येथे कार्यक्रम
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त झरी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी ८.३० वाजता शिवाजी चौक येथे हा कार्यक्रम होणार असून त्यानंतर मोटारसायकल रॅली, दुपारी १२ वाजता रथयात्रा काढण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता विशाल देशमुख बोरीकर यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर शिव-शंभू टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षा आयोजित केली आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)