पैसे भरून वाहनांची सुरक्षा रामभरोसे
By Admin | Published: September 30, 2014 01:06 AM2014-09-30T01:06:46+5:302014-09-30T01:30:15+5:30
औरंगाबाद : नवरात्रोत्सवामधील मराठवाड्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून कर्णपुरा यात्रेची ख्याती आहे. येथे रोज लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत.
औरंगाबाद : नवरात्रोत्सवामधील मराठवाड्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून कर्णपुरा यात्रेची ख्याती आहे. येथे रोज लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. येथे भाविकांकडून पार्किंगचे पैसे घेऊन तुमच्या वाहनाची जबाबदारी आमची नाही, असे स्पष्ट सांगितले जात आहे. यामुळे पैसे भरूनही वाहनांची सुरक्षा रामभरोसे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
छावणी परिषदेने यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची व्यवस्था आणि सुरक्षेसाठी पार्किंगचे टेंडर काढले होते. यात्रेच्या वेळेत पार्किंग चालविण्याचे टेंडर ४ लाख ९८ हजार रुपयांत गेले आहे. या अधिकृत पार्किंगमध्ये दुचाकीसाठी १० रुपये, तर चारचाकी वाहनांसाठी २० रुपये आकारले जात आहेत; पण पार्किंगमध्ये वाहन लावल्यानंतर प्रत्येक वाहनधारकांना पार्किंगची पावती देण्यात येत नाही. वाहन घेऊन जाताना पार्किंगचे पैसे घेतले जातात. विशेष म्हणजे पार्किंगमध्ये वाहन लावल्यानंतर देण्यात येणाऱ्या पावतीवर गाडीचे नुकसान झाल्यास पार्किंग जबाबदार नाही, ही सूचना असल्यामुळे पार्किंगचे पैसे भरूनही फायदा नाही. वाहनाच्या सुरक्षेची जबाबदारी टेंडरधारकाची नाही, तर पैसे घेता कशाचे असा प्रश्न वाहनधारक करीत आहेत. यात्रेच्या परिसरात तीन पार्किंग असून, दोन पार्किंगमध्ये दुचाकीसाठी १० रुपये, चारचाकीसाठी २० रुपये आकारले जातात. एका पार्किंगमध्ये दुचाकीसाठी २० रुपये, तर तीन आणि चारचाकीसाठी चक्क ५० रुपये पार्किंग आकारली जात आहे.