स.भु.च्या अध्यक्षपदी राम भोगले, तर दिनेश वकील उपाध्यक्षपदी बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:05 PM2018-12-18T23:05:47+5:302018-12-18T23:06:14+5:30
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी प्रख्यात उद्योगपती राम भोगले हे आज झालेल्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी विद्यमान अध्यक्ष बॅ. जवाहर गांधी यांना पराभूत केले. अॅड. दिनेश वकील यांची यापूर्वीच उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे.
औरंगाबाद : सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी प्रख्यात उद्योगपती राम भोगले हे आज झालेल्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी विद्यमान अध्यक्ष बॅ. जवाहर गांधी यांना पराभूत केले. अॅड. दिनेश वकील यांची यापूर्वीच उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे.
स.भु. मध्यवर्ती कार्यालयात आज सकाळी १० ते ३ या वेळेत स.भु. शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाची निवडणूक झाली. एकूण ८४ मतदारांपैकी ७५ मतदारांनी मतदान केले. त्यातले एक मत अवैध ठरले.
राम भोगले यांना ४३ मते मिळाली, तर बॅ. गांधी यांना ३१ मते मिळाली. आश्रयदाता सभासदांमधून प्राचार्य उल्हास शिवूरकर हे ४८ मते मिळवून विजयी झाले, तर ज्ञानप्रकाश मोदाणी यांना २७ मते मिळाली व ते पराभूत झाले. हितचिंतक सभासदांमधून प्रशांत देशपांडे हे विजयी झाले. त्यांना ४४ मते मिळाली, तर ओमप्रकाश राठी यांना २९ मते मिळाली व ते पराभूत झाले.
सर्वसाधारण सभासदांमधून ११ उमेदवार निवडायचे होते. त्यासाठी एकूण १६ उमेदवार उभे होते. विजयी उमेदवारांची नावे अशी- डॉ. नंदकुमार उकडगावकर (६५ मते), डॉ. सुधीर रसाळ (५३ मते), डॉ. श्रीरंग देशपांडे (५१ मते), मिलिंद रानडे (४९ मते), माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर (४८ मते), अॅड. रामेश्वर तोतला (४८ मते), डॉ. सुहास बर्दापूरकर (४४ मते), अरुण मेढेकर (४४ मते), डॉ. रश्मी बोरीकर (४३ मते), माधव गुमास्ते (३८), जुगलकिशोर धूत (३७ मते)
प्रमोद माने (३४ मते), अमोल भाले (३२ मते), डॉ. बाळकृष्ण क्षीरसागर (३५ मते), काशीनाथ नानकर (२२ मते) व सुहास पानसे (३५ मते) हे उमेदवार पराभूत झाले.
डॉ. डी.डी. कायंदे यांनी मतमोजणी अधिकारी म्हणून काम पाहिले. प्रा. दिनकर बोरीकर यांच्या निधनानंतर बॅ. जवाहर गांधी हे अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळीत होते. आता स.भु.चे सरचिटणीस, सहसिचटणीस व कोषाध्यक्ष हे पदाधिकारी आज निवडून आलेले उमेदवार निवडतील. स.भु.मध्ये अध्यक्ष व सरचिटणीस या पदांना अधिक महत्त्व आहे. आता सरचिटणीसपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहावयाचे.
स.भु. शिक्षण संस्था ही समाजवाद्यांची म्हणून ओळखली जायची. गोविंदभाई श्रॉफ यांनी या संस्थेचे अध्यक्षपद वर्षानुवर्षे सांभाळलेले. आता या संस्थेची प्रतिमा ‘समाजवादी’ अशी कितपत राहील, अशी शंका व्यक्त होत आहे.