राम नवमी विशेष : रझाकारी संघर्षातून उभारले अजिंठ्याचे राम मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:04 AM2021-04-21T04:04:42+5:302021-04-21T04:04:42+5:30
श्यामकुमार पुरे अजिंठा : दरवर्षी अजिंठा येथील राम मंदिरात भजन, कीर्तन, भंडारा, रामलीला, पालखी अशा विविध उपक्रमांनी राम नवमी ...
श्यामकुमार पुरे
अजिंठा : दरवर्षी अजिंठा येथील राम मंदिरात भजन, कीर्तन, भंडारा, रामलीला, पालखी अशा विविध उपक्रमांनी राम नवमी साजरी केली जाते. यावर्षी कोरोनामुळे हा उत्सव साधेपणाने साजरा होणार असला तरी, येथील राममंदिर स्थापनेचा एक जाज्वल्य इतिहास आहे. रझाकाराच्या जुलमी अत्याचारी कालखंडात महत्प्रयासाने हे मंदिर उभारण्यात आले आहे. १९३० साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून, आज याला ९१ वर्षे पूर्ण झाली आहेत.
हैदराबाद संस्थानच्या निजामी अमलाखाली असलेल्या मराठवाड्याला संघर्षाचा इतिहास आहे. या संघर्षात अनेक धार्मिक स्थळेही मराठवाड्याच्या अस्मितेला प्रखरतेने प्रदर्शित करतात. त्यापैकीच एक म्हणजे अजिंठ्याचे
राम मंदिर होय. अनेक शतकांपासून अजिंठ्याच्या गांधी चौकात एक छोट्याशा घुमटीत राम मंदिर होते. या राम मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा ही अजिंठ्यातील हिंदूधर्मीयांची इच्छा होती.
यात अजिंठ्यातीलच आनंदराव देशपांडे, आंनदसिंग राजपूत, किसनसिंग मास्तर, बाजीलाल गुप्ता, रामराव देशमुख, बिरा चौधरी, किसन आनंदा, धोंडू मिस्त्री, रामसिंग मिस्त्री, बैरागी हे प्रमुख होते. मात्र, अजिंठा हे प्रमुख रझाकारी केंद्र असल्याने याला रझाकारांचा प्रखर विरोध होत होता. १८८४ साली जामनेरचे सराफा प्रभाकर वामन साठे अजिंठ्यात जिनिंग प्रेसिंगच्या व्यवसायानिमित्त स्थायिक झाले होते.
त्यांनी जनजागृती करून श्रीराम मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प बोलून दाखवला. त्यानुसार जमीन विकत घेऊन लोकवर्गणी करण्यात आली. हा प्रकार बघून रझाकारांनी आपला विरोध प्रखर केला. यातून रक्तरंजित संघर्षाची धग जाणवू लागली. यातून मार्ग काढीत प्रभाकर वामन साठे हे सालारजंग मीर युसूफ अली खान यांच्या भेटीस हैद्राबादला गेले. तेथे त्यांनी सालारजंग यांना अजिंठ्यात एकही मोठे हिंदू मंदिर नाही, यासाठी राम मंदिर बांधकामाला परवानगी मागितली. सालारजंग यांनीही ती देऊन निजामी मोहर असलेले बांधकाम परवानगीचे पत्र दिले. यानंतर राम मंदिर बांधकामाला सुरुवात झाली. त्यानंतरही राम मंदिर बांधताना रझाकारांनी दगडफेक करणे, चुना भट्टीचे बैल हुसकावून लावणे आदी प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली. मात्र, अजिंठ्यातील जनतेने यास जुमानले नाही. शेवटी ७ एप्रिल १९३० रोजी रांगोळ्यांची आरास, सनई-चौघड्याच्या मंगलमयी सुरात श्रीरामाची मिरवणूक काढण्यात आली. अजिंठ्यातील राम मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला. त्या मंदिरास तालुक्यातील एकमेव राम मंदिराचे बिरूद मिळाले. आज रोजी मंदिरात असलेली श्रीराम, लक्ष्मण, सीता यांची मूर्ती ही प्रभाकर साठे यांनी जयपूरहून आणली होती. अजिंठ्यात असलेल्या श्रीराम मंदिरात राम नवमीला खूप गर्दी होते; पण कोरोनामुळे यावर्षीसुद्धा साध्यापणाने राम नवमी साजरी करण्यात येत आहे.
कोट
अजिंठ्यातील श्रीराम मंदिराची उभारणी ही आमच्या पूर्वजांच्या अस्मितेची लढाई होती. यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला व तालुक्यातील पहिले राम मंदिर उभारले, याचा आम्हाला अभिमान आहे.
- माधवराव काशिनाथ साठे, ज्येष्ठ नागरिक.
फोटो कॅप्शन- अजिंठा येथील श्रीराम मंदिर