रामायण क्रूज सेवा शरयू नदीत घडविणार रामचरितमानस यात्रा
By | Published: December 3, 2020 04:08 AM2020-12-03T04:08:48+5:302020-12-03T04:08:48+5:30
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील शरयू नदीवर लवकरच रामायण क्रूज सेवा सुरू होणार असून, तिच्याद्वारे पर्यटकांना रामचरितमानस यात्रा ...
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील शरयू नदीवर लवकरच रामायण क्रूज सेवा सुरू होणार असून, तिच्याद्वारे पर्यटकांना रामचरितमानस यात्रा घडविली जाणार आहे.
बंदरे, जहाज, जल वाहतूक मंत्रालयाने मंगळवारी म्हटले आहे की, शरयू नदीवर पहिली लक्झरी क्रूज सेवा लवकरच सुरू होणार आहे. अयोध्येत येणाऱ्या भाविकांना कायम स्मरणात राहील असा अनुभव देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. ही क्रूज सेवा लोकप्रिय घाटांवरून जाईल व यात्रेकरूंना अनोखा अनुभव देईल, असा प्रयत्न आहे. क्रूज सेवा सुरू करण्याबाबत आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक घेण्यात आली.
या क्रूजवर सर्व प्रकारच्या लक्झरी सुविधा असतीलच, शिवाय अत्यावश्यक सुरक्षेचेही भान ठेवले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार, ही सेवा देण्यात येईल.
..........................
अशी असेल क्रूज सेवा
१) संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या क्रूजमध्ये काचेच्या मोठ्या खिडक्या असतील. त्यातून भाविकांना घाटांची सुंदरता डोळ्यांत साठवून ठेवता येणार आहे.
२) क्रूजमध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी स्वयंपाकघरही असणार आहे.
३) जैव शौचालयांची सुविधा.
४) क्रूज हायब्रिड इंजिनने सुसज्ज असेल. त्याचा पर्यावरणावर परिणाम होणार नाही.
५) एक ते सव्वातासात क्रूज १५ ते १६ किलोमीटरचा प्रवास.
६) क्रूजमध्ये रामचरितमानसवर आधारित एक व्हिडिओ दाखविला जाणार आहे. भगवान श्रीरामांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या कालखंडाची कथा त्याद्वारे दाखविण्यात येईल.