रामचंद्रनगर-साई काॅलनीत चिखलातून शोधावी लागते वाट; पावसाळ्यातही टँकर,जारचे येते पाणी
By साहेबराव हिवराळे | Published: June 20, 2024 07:28 PM2024-06-20T19:28:09+5:302024-06-20T19:28:39+5:30
एक दिवस एक वसाहत: शाळा सुरू झाल्या आहेत, पण रस्त्याचे असे हाल असल्याने विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत मुलांना नेताना काळजी घ्यावी लागत आहे.
छत्रपती संभाजीनगर : मयूर पार्कमध्ये वडाच्या झाडापासून ते रामचंद्रनगर चौक, साई कॉलनी या मुख्य रस्त्याला दोन महिन्यांपासून अर्धवट खोदून तसेच पडू दिल्याने रहिवाशांना चिखलातून वाट शोधावी लागते. या भागात पाणीटंचाईमुळे पावसाळ्यातसुद्धा टँकर अन् जारच्या पाण्यावर तहान भागवावी लागते आहे.
शाळा सुरू झाल्या आहेत, पण रस्त्याचे असे हाल असल्याने विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत मुलांना नेताना काळजी घ्यावी लागत आहे. पालकांनाही सातत्याने ही चिंता भेडसावत आहे. आता मोठा पाऊस पडल्यास परिसराला बेटाचे स्वरूप येण्याची भीती रहिवाशांना वाटत आहे. सरपटणारे प्राणी घराच्या जवळ बऱ्याचदा आढळतात. त्यामुळे नागरिकांना घाबरूनच राहावे लागत आहे. ड्रेनेजलाईनही मनपाने टाकली नसून स्वखर्चाने रहिवाशांनीच पैसे गोळा करून टाकली आहे. अशा एक नव्हे तर अनेक प्रश्नांची सोडवणूक करायला मनपा अधिकारी व कुणीही पुढे येण्यास तयार नाही.
दोन दिवस अंधारात
वीज बिल पूर्ण अदा करूनही दोन दोन दिवस वीजपुरवठा खंडित असतो. फ्यूज कॉल सेंटर व अधिकाऱ्यांना कळवूनही प्रश्न सुटत नाही, अशी साई कॉलनीची दशा आहे.
- रामदास बलांडे, रहिवासी
घंटागाड्या येत नाहीत
परिसरात घंटागाडीच येत नाही. त्यामुळे नागरिकांना कचरा अनेक दिवस घरात साठवून आजारांना आमंत्रण द्यावे लागत आहे.
- विजयमाला भालेराव, रहिवासी
किती दिवस त्रास?
नागरिकांनी जागा विकत घेतली अन् घरे बांधली. औषध फवारणी करायला कुणीही येत नाही. आम्ही शहरात आहोत की खेड्यात; हेच कळत नाही.
- मदन सानप, रहिवासी
सुविधा का नाही?
मूलभूत सुविधा देण्याकडे कानाडोळा का केला जातो? पावसाळ्यात परिसरातील अवस्था अत्यंत वाईट होणार असून, नातेवाईक पावसाळ्यात चुकूनही फिरकत नाहीत.
- विजय वाढेकर, रहिवासी