रमेश पवारांनी तडकाफडकी लातूर सोडले!
By Admin | Published: May 18, 2017 12:11 AM2017-05-18T00:11:35+5:302017-05-18T00:19:12+5:30
लातूर : लातूर मनपाचे आयुक्त रमेश पवार यांचा पदभार शासनाने काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविला आहे़ त्यामुळे पवार यांनी तडकाफडकी लातूर सोडले
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : लातूर मनपाचे आयुक्त रमेश पवार यांचा पदभार शासनाने काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविला आहे़ त्यामुळे पवार यांनी तडकाफडकी लातूर सोडले असून, एका चांगल्या अधिकाऱ्याला सात-आठ महिन्यातच कंत्राटदाराच्या बिलावरून पदभार सोडावा लागला आहे़
आठ महिन्यांपूर्वी रमेश पवार यांनी लातूर मनपाच्या आयुक्त पदाचा पदभार घेतला़ पदभार घेताच त्यांनी मनपातील कामकाज आऊट सोर्सिंगद्वारे करण्यावर भर दिला़ स्वच्छता अभियानाच्या कामातही गती घेऊन शौचालयाची कामे पूर्ण केली़ मनपाचे चारही झोन कार्यालये सक्षम केली़ मुख्य कार्यालयाचा ताण कमी करून झोन कार्यालयातून नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न केला़ शिवाय, अमृत योजनेच्या कामालाही गती दिली़ अल्पावधीतच चांगला अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण केली़ मात्र त्यांचा पदभार शासनाने काढून घेतला़ चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीशी राहण्याऐवजी सरकारने त्यांनाच दणका दिला, अशी चर्चा मनपाच्या वर्तुळात सुरू आहे़
स्थानिक पुढाऱ्याच्या मदतीने एका बड्या कंत्राटदाराने बिल काढण्यासाठी मनपा आयुक्त पवार यांच्यावर दबाव आणला होता़ साडेतीन कोटीच्या आसपास बिल असल्याचे बोलले जाते़ परंतु, मनपाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने बिल काढल्यास त्यांनी नकार दिला होता़ त्यामुळे राज्य शासनाकडे संबंधित कंत्राटदार व काही स्थानिक पुढारी वजन वापरून त्यांचा पदभार काढण्यास यशस्वी झाले, अशीही चर्चा मनपाच्या वर्तुळात आहे़ सध्या मनपातील तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे व सफाई कामगारांचे वेतन थकले आहे़ या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केल्याशिवाय कोणत्याही कंत्राटदाराचे बिले काढता येणार नाहीत, असा पवित्रा पवार यांनी घेतला होता़ त्यामुळे दुखावलेल्या ‘त्या’ कंत्राटदाराने स्थानिक पुढाऱ्यांच्या मदतीने शासनाकडे वजन वापरले आणि त्यात ते यशस्वी झाले, अशी जोरदार चर्चा मनपात आहे़ केंद्र व राज्य शासनाच्या अमृत योजनेचा निधी व मनपाने काढलेल्या कोट्यवधीच्या कंत्राटावरून आयुक्त आणि कंत्राटदारामध्ये मतभेद झाले होते़ त्यामुळेच त्यांचा पदभार काढण्यासाठी राजकीय वजन वापरल्याची चर्चा आहे़ दरम्यान, शासनाकडून आदेश प्राप्त होताच आयुक्त रमेश पवार यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवून पुणे गाठले आहे़