रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:39 AM2018-04-11T01:39:23+5:302018-04-11T11:06:29+5:30
लाभक्षेत्रातील शेतकरी आनंदी : २० वर्षांपासून बंद पडलेल्या योजनेला संजीवनी
वैजापूर : तालुक्यातील दहेगाव येथील बंद पडलेली रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी ५ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मंजूर केला आहे. त्यामुळे मागील २० वर्षांपासून बंद असलेल्या या योजनेला संजीवनी मिळाली असून योजनेच्या पुनर्जीवनाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी आनंदी झाले आहेत.
गोदावरीच्या बँक वॉटरचा वापर करुन तालुक्यातील गावांना सिंचनाचा फायदा व्हावा, या उद्देशाने माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांच्या पुढाकारातून रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेमुळे तालुक्यातील २३ गावांतील १७०० एकर जमीन तसेच गंगापूर तालुक्यातील काही गावांना सिंचनाचा फायदा मिळणार होता. पण कर्जाच्या बोजामुळे ही योजना बंद पडली. या योजनेसाठी सहकारी संस्थेने जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ३७ कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून ही रक्कम व्याजासह १३० कोटी रुपये झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक ६५ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यास तयार असून उर्वरित कर्ज शासनाने माफ करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकºयांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा असल्याने इतर बँका या शेतकºयांना कर्ज देत नसल्याने या भागातील शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. रामकृष्ण गोदावरी योजनेचा वापर फक्त निवडणुकीचा मुद्दा म्हणून केला गेला. प्रत्यक्षात ही योजना सुरु करण्यासाठी लोकप्रतिनिधींना अपयश आले, असा आरोप होत होता. रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना कृती समितीचे अध्यक्ष जे.के. जाधव यांनी गेल्या वर्षी कनकसागज, टाकळीसागज या भागातील शेतकºयांना सोबत घेऊन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची औरंगाबाद येथे भेट घेऊन योजना सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यावेळी बागडे यांनी योजना सुरु करण्यासाठी अनुकुल प्रतिसाद दिला होता. त्यानंतर योजनेतील पंपिग मशीन, पाईपलाईन, व्हॉल्व्ह व इतर नादुरुस्त मशिनरी सुरु करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मागील वर्षी मे महिन्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील बंद पडलेल्या सिंचन योजना सुरु करण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने हिरवा कंदिल दाखविला असून पाच कोटी ७१ लाख रुपयांचा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मंजूर केला आहे.
वैजापूर व गंगापूर तालुक्यातील ३८ गावांना फायदा
वैजापूर व गंगापूर तालुक्यातील ३८ गावांना सिंचनाचा मोठा फायदा मिळणार आहे. ही योजना सुरु झाल्यास ग्रामीण भागासह वैजापूर शहर, नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील जांबरगाव व रोटेगाव येथील औद्योगिक वसाहतीला पाणी मिळणार आहे.
घोटाळ्यामुळे १९९९मध्ये योजना डबघाईस
१९९०-९१ या वर्षात या महत्त्वाकांक्षी योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. गोदावरी नदीतील कायगाव टोका येथून जायकवाडी धरणाच्या फुगवट्यातील पाणी वैजापूर तालुक्यात भूमिगत पाईपलाईनद्वारे आणण्याच्या या योजनेस १९९१ मध्येच यशही आले. मात्र, ही योजना जास्त काळ टिकली नाही. व्यवस्थापनाचे ढिसाळ नियोजन व आर्थिक घोटाळ्यामुळे १९९९ ला योजना डबघाईस येऊन बंद पडली. यामुळे हजारो शेतकºयांच्या बागायती शेती करण्याच्या स्वप्नाला तडा गेला. याशिवाय योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी सभासदांच्या जमिनीवर जिल्हा बँकेच्या कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते.
मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांचे सहकार्य
अनेक वर्षांपासून बंद असलेली रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यासाठी वीस वर्षात काँग्रेस सरकारकडे पाठपुरावा करूनही या सरकारकडून केवळ आश्वासनाचे गाजरच मिळाले. त्यामुळे येथील शेतकºयांची अवस्था वाईट झाली. याउलट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रयत्नांमुळे ही योजना सुरु होत आहे, असे माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांनी सांगितले.