रामनाथ पोकळे जालन्याचे नवे पोलीस अधीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2017 12:49 AM2017-04-29T00:49:36+5:302017-04-29T00:52:40+5:30
जालना : पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांची पुणे शहर उपायुक्त पदी बदली झाली
जालना : पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांची पुणे शहर उपायुक्त पदी बदली झाली असून, त्यांच्या जागेवर पुणे सीआयडीचे अधीक्षक रामनाथ पोकळे हे रुजू होणार आहेत. तर अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांची नागपूर शहर उपायुक्त म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागेवर लातूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक लता फड यांची बदली झाली आहे. याबाबतचे आदेश गृहविभागाने गुरुवारी रात्री उशिरा काढले.
राज्यातील बहुतांश पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार जालन्याच्या पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांचा सेवा कार्यकाल संपुष्टात आल्याने त्यांची पुणे शहर उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर भोकरदन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहिलेले रामनाथ पोकळे यांची जालन्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भोकरदनमध्ये कार्यरत असताना पोकळे यांची उल्लेखनीय काम केले होते. प्रोबेशनरी म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर भिवंडी येथे त्यांची नियुक्ती झाली होती. सध्या पोकळे पुण्यात राज गुन्हे अन्वेषण विभागातील सायबर सेलचे अधीक्षक म्हणून कार्यरत होते. पोलीस ठाणे आॅनलाईन करण्याच्या दृष्टिने त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. भिवंडी येथे कार्यरत असताना आॅईल भेसळ करणाऱ्यांवर त्यांनी कठोर कारवाई करुन तेल माफियांवर मकोका कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. तर आता अवैध गुटखा विक्री, अवैध प्रवासी वाहतूक यांसह इतर आव्हाने पोकळे यांच्यासमोर असतील. पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांत शिस्त आणण्यासह दामिनी पथक स्थापन करुन रोडरोमिओंना धडा शिकवला.त्यामुळे छेडछाडीचे प्रमाण कमी झाले. तीन वर्षांच्या कार्यकाळात सिंह यांनी आपल्या कार्यपद्धतीची छाप पोलीस दलावर सोडली. तर अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या जागेवर लता फड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माकणीकर यांनी गत दोन वर्षांच्या काळात उल्लेखनीय काम केले आहे. अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा तपास त्यांनी पूर्ण केला. (प्रतिनिधी)