करंजगाव शिवारात वस्त्यांवर दरोडा
By Admin | Published: August 31, 2016 12:04 AM2016-08-31T00:04:04+5:302016-08-31T00:37:06+5:30
परसोडा : करंजगाव (ता. वैजापूर) शिवारातील नरोडे वस्ती व रोठे वस्तीवर सोमवारी (दि.२९) रात्री साडेअकरा ते एक वाजेच्या सुमारास दरोडा पडला.
परसोडा : करंजगाव (ता. वैजापूर) शिवारातील नरोडे वस्ती व रोठे वस्तीवर सोमवारी (दि.२९) रात्री साडेअकरा ते एक वाजेच्या सुमारास दरोडा पडला. दरोडेखोरांनी दोघांना बेदम मारहाण करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने, असा एकूण ६0 ते ७0 हजार रुपये घेऊन पोबारा केला. दोन्ही वस्त्यांवर दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोन गंभीर जखमीसह पाच जण जखमी झाले.
करंजगाव रेल्वेस्थानकानजीक चंद्रभान बारकू नरोडे यांच्या घराची कडी तोडून रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. नरोेडे यांना दोन तास खोलीत डांबले. घरातील व बाहेरील विज पुरवठा खंडित करून घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करून महिलांकडे पैसे व दागिन्यांची मागणी केली. दागिने न दिल्यामुळे चंद्रभान नरोडे यांना जबर मारहाण केली. तेथून दरोडेखोरांनी मुंबई-नागपूर हायवेवर असलेल्या मुलचंद भिक्कन रोठे यांच्या घराचा दरवाजा कुऱ्हाडीने तोडून घरात प्रवेश केला. सुंदरबाई रोठे यांना मारहाण केली. हे पाहून वाल्हूबाई रोठे (३०) या दरोडेखोरांच्या मारण्याच्या भितीने घराच्या छतावर गेल्या व तेथून खाली उडी मारल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील शेतकरी मदतीला धाऊन आले. त्यामुळे दरोडेखोरांनी तेथून पळ काढला.
ही माहिती वैजापूर पोलीस ठाण्याला कळविल्यानतंर काही वेळातच पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, स.पो.नि. प्रकाश पाटील, गणेश जमादार, नारायण कटकुरे, गणेश पाटील हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने करंजगाव परिसर पिंजून काढला, परंतु दरोडेखोरांचा तपास लागला नाही.
दोन्ही वस्तीवरील जखमी चंद्रभान नरोडे, बबई नरोडे, गुलचंद रोठे, सुंदरबाई रोठे, वाल्हूबाई रोठे यांना उपचारासाठी रात्रीच वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळास पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस निरीक्षक उज्वला वनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हर्ष पोद्दार यांनी भेट दिली. श्वानपथक व अंगुली निर्देशकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने हडस पिंपळगावपर्यंत माग काढला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर करीत आहे.