गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 07:37 PM2018-05-12T19:37:18+5:302018-05-12T19:37:18+5:30

दिवा लावू अंधारात : ही कथा आहे एका माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेत एखाद्या अत्यंत गरीब, दारिद्र्यात खितपत पडलेल्या व्यक्तीचा अत्यंत क्रूरपणे खून केला जातो आणि त्यानंतर त्याचा रस्त्यावर आलेला परिवार. त्याच्या आई, बायको आणि लहान मुलांची झालेली परवड. अचानक कोसळलेल्या अभाळामुळे रोजची चूल पेटवण्याचेच सामर्थ्य नसताना पतीच्या खुनाचा तपास लावून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी करावी लागणारी धावपळ, खर्च करावा लागणारा पैसा आणि तपास यंत्रणा गतिमान करण्यासाठी आणावा लागणारा मोठमोठ्या व्यक्तींचा राजकीय दबाव, ही हतबल झालेली पत्नी कुठून आणणार. जिथे सहजासहजी न्याय मिळेल अशी यंत्रणा आपल्याकडे कार्यरत आहे का...? तिचा चिमुकल्यांच्या पोटासाठी चाललेला संघर्ष तिच्या पतीच्या खुन्यांना समाजात मोकाट फिरण्यासाठी तो मदत करतो आणि हे क्रूरकर्मा समाजात उजळ माथ्याने फिरत राहतात पुन्हा दुसरा गुन्हा करण्यासाठी.

Ramshastri joined the crowded guards | गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री

गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री

googlenewsNext

- दीपक नागरगोजे 

बीड तालुक्यातील नेकनूरजवळ सानपवाडी नावाचं एक छोटेसे गाव. उजाड माळरानावर वसलेले. जमीन कोरडवाहू. पावसावर आधारित शेती असल्याने फक्त जमिनीच्या उत्पन्नावर कुणाचंही पोट भरत नाही. राखणीसाठी म्हणून घरी राहणारी म्हातारी माणसे सोडली तर जवळ जवळ  सर्वच कुटुंब ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यावर जातात. याच गावातील रहिवासी सुसेन नवनाथ सानप. आई, पत्नी भाग्यश्री आणि लहू, अंकुश या दोन चिमुकल्यांसह राहत होते. वडिलोपार्जित अडीच एकर डोंगर उताराच्या शेतीवर कुटुंबाची उपजीविका भागवणे कठीण असल्याने ऊसतोडणीसाठी वर्षातील सहा महिने बिºहाड घेऊन साखर कारखान्यावर जाणे ठरलेलेच. सुसेन सानप ऊसतोडणी करता करता त्याच ठिकाणी छोटा मोठा  बैलांचा व्यापार करूनही दोन पैसे मिळवत. यातून रोजचा प्रपंच खर्च मिळवायचा प्रयत्न असे. व्यापाराच्या माध्यमातून इतर अनेक व्यापाऱ्यांशी त्यांचा संपर्क आला होता. कष्टाची भाकरी खाऊन आनंदात दिवस चालले होते. ऊसतोडणी आणि बैलांचा व्यापार पोटापुरती चटणी भाकरी देत होता.  ७ वर्षांचा अंकुश आणि ८ वर्षांचा लहू आनंदाने वाढत होते.

दोन वर्षे झाली त्या घटनेला. कारखान्यावर बि-हाड घेऊन जायचे दिवस जवळ आले होते. सुसेन आणि सर्व ऊसतोड कामगार जाण्याची तयारी करीत होते. बैलांची देवाण-घेवाण जोमात होती. सुसेन बैलांचा जमेल तितका व्यापार करीत होते. एक दिवस घराच्या बाहेर जनावरांना पाणी पाजत असताना एक फोन आला की तुम्ही आमच्या गावाकडे या. काही बैल विक्री करायचे आहेत. त्यांना आलेला हा फोन पत्नी भाग्यश्रीने ऐकला होता. फोनवर बोलणे झाल्याप्रमाणे भाग्यश्रीला गावाला जातोय. उद्या परत येईल, असे सांगत घरातील कासरे घेऊन सुसेन निघून गेले. उद्या येतो म्हणून सांगून गेलेला माणूस दोन दिवस झाले. तीन दिवस झाले परत आला नाही. म्हणून भाग्यश्री आणि सुसेनचे भाऊ चंद्रसेन यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात सुसेन बेपत्ता असल्याची तक्रार दिली. शोध सुरू झाला.

पुढील चार दिवसांत चाकरवाडी तलावात एक प्रेत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलीस चंद्रसेन आणि नातेवाईकांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. प्रेत पाण्यातून बाहेर काढले. प्रेताला शीर नव्हते. हात-पाय बांधून टाकलेले फक्त धड. बैल आणण्यासाठी घरातील जे कासरे सुसेन घेऊन गेला होता त्याच कासऱ्यांनी बांधून त्याचे धड तलावात फेकून देण्यात आले होते. मारेकऱ्यांनी सुसेनचे शीर तीक्ष्ण हत्याराने कापून कुठेतरी बेपत्ता केले. ते सापडले नाही.  इतक्या क्रूरपणे मारेकऱ्यांनी सुसेनचा खून केला होता. सुसेनची ही अवस्था पाहून भाऊ चंद्रसेन, आई सीताबाई, पत्नी भाग्यश्री आणि मुलांनी टाहो फोडला. डोंगराएवढे दु:ख या परिवारावर कोसळले. हे क्रूर कृत्य करताना सुसेनच्या परिवारावर काय परिस्थिती कोसळेल याचा विचारही हत्याऱ्यांनी कसा केला नसेल? कष्टाची चटणी भाकरी खात जगणाऱ्या सुसेनला हे जग सोडायला लावून त्याच्या कुटुंबाला रस्त्यावर आणण्याचे पाप केले. थोडीही माणुसकी त्यांच्याकडे कशी राहिली नसेल? गुन्हेगार क्रूर असतात. त्यांना भावना नसतात हेच यातून सिद्ध होते. चंद्रसेन आणि भाग्यश्रीने  पोलिसात रीतसर तक्रार दिली. खुनाचा गुन्हा नोंद झाला. त्या दिवशी कुणाचा फोन आला होता. कुणी कुठल्या गावाला बोलावले होते याची इत्थंभूत माहिती भाग्यश्रीने पोलिसांना सांगितली. एवढेच नव्हे तर कुणी हे कृत्य केले याचीही माहिती तिने पोलिसांना दिली. 

पोलिसांनी जबाबदारीने हे प्रकरण हाताळले नाही. पोलीस तपासात निष्काळजीपणा झाला. सासू, दोन चिमुकले यांचा भार भाग्यश्रीवर आला. त्यांना जगवण्याच्या त्रासात ती पोलीस तपासाचा पाठपुरावा करू शकली नाही. आपल्या पतीच्या मारेकऱ्यांची नावे सांगूनही पोलिसांनी तिचे म्हणणे ऐकून घेतले नाही.  पतीच्या हत्येचा शोध लावला जावा या मागणीसाठी तिने पोलीस ठाण्यासमोर उपोषण केले. पण तात्पुरतं समाधान करून पोलिसांनी तिचे उपोषण मोडून काढण्यात यश मिळविले. ठाण्यात चकरा मारून ती दमून गेली, पण कुठलीही राजकीय किंवा सामाजिक व्यक्ती तिच्या मदतीला धावून आली नाही. कितीही चकरा मारल्या तरी न्याय मिळू शकत नाही आणि कुणी आपल्याला मदतही करू शकत नाही. उलट या प्रयत्नात लेकरं उपाशी मरतायेत, असे तिला वाटू लागले. ती हतबल झाली.  

राहायला व्यवस्थित घरही नव्हते. गावाच्या माळरानावर ४ पत्र्यांचे शेड मारून तिथेच ती राहू लागली. सोबत भावकीतील चार कुटुंबे होती. भाग्यश्रीचे अशा परिस्थितीतील जगणे केजचे सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांनी मला सांगितले. यानंतर त्याला सोबत घेत मी, सुरेश राजहंस सानपवाडीतील तिच्या वस्तीवर पोहोचलो. उजाड माळरानावर तीव्र उन्हाच्या प्रहारात चार पत्र्यांच्या घरात आम्ही भाग्यश्री आणि तिच्या लेकरांना भेटलो. तिच्याकडून हे सर्व ऐकले.  एवढा वाईट प्रसंग असूनही काही नातेवाईक सुसेनकडे असणाऱ्या कर्जासाठी भाग्यश्रीला सतावत असल्याचेही तिने सांगितले. खूप वाईट वाटले. आतापर्यंतच्या सर्व प्रवासात ही एक वाईट घटना ऐकायला, पाहायला मिळाली. भाग्यश्री आणि सासू सीताबाई सांगताना रडत होत्या. आम्ही त्यांना समजावत होतो. आम्हालाही अश्रू आवरता येत नव्हते. आम्ही तिला शांतिवनच्या कामाची माहिती दिली.

तुझ्यासाठी आम्ही काही करू शकतो, असे तिला सांगितले. तू शांतिवनला चल म्हणालो. मुलांच्या पालन, पोषण आणि शिक्षणाची जबाबदारी आम्ही उचलली. भाग्यश्रीला शांतिवनमध्ये काम देण्याचे ठरवले. पुढील चार दिवसांत भाग्यश्री, लहू, अंकुशला घेऊन शांतिवनात आलो. आज लहू तिसरीत आहे. अंकुश चौथीत शिक्षण घेत आहे. भाग्यश्रीला मेसमध्ये काम दिले असून, तिचेही शांतिवनमध्ये पुनर्वसन केलेय. दीड वर्ष होऊन गेले तिघेही आनंदात राहत आहेत. पण भाग्यश्री आणि चिमुकल्यांच्या मनातून आपल्या पती-वडिलांच्या आठवणी काही केल्या जात नाहीत. त्यांची झालेली क्रूर हत्या त्यांच्या डोळ्यासमोरून जात नाही. पतीची हत्या होऊनही आपल्या परिस्थितीमुळे  त्यांना न्याय मिळवून देऊ शकलो नाहीत. त्यांचे मारेकरी मोकाट फिरतात, याची खंत तिच्या मनात सारखी सलत असते. इथे गरिबांना न्याय मिळत नाही, तो विकत घ्यावा लागतो, अशी तिची पक्की समजूत झाली आहे. मनातली मनात ती कुढत असते. आम्हा सर्वांना वाईट वाटते.

दोन वर्षे होऊन गेले सुसेनचे मारेकरी पोलिसांना सापडले नाहीत. तपासात कुठलीही प्रगती नाही. अजूनही चार्ज शीट कोर्टात दाखल झाला नाही. अशी सुरक्षा यंत्रणा. तपास यंत्रणा इतकी सुस्तावलेली असेल तर इथे गरिबांना न्याय खरंच मिळतो का? पोलीस न्यायाच्या मागे असतात की अन्याय करणाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी? खरंच न्याय मिळविण्यासाठी पैसे लागतात का? तो विकत घ्यावा लागतो का?  भाग्यश्रीसारख्या किती जणी न्यायासाठी झगडत हतबल होऊन निकालाआधीच हरलेल्या असतील?  किती सुसेन मारून क्रूरकर्मी समाजात उजळ माथ्याने फिरत असतील? असे कितीतरी प्रश्न मनाला पडतात अन् सुन्न होतो. हे सर्व पाहून  सुरेश भटांची ती कविता खरी वाटू लागते.

गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविन मढ्याला आता उपाय नाही.

( deepshantiwan99@gmail.com)
 

Web Title: Ramshastri joined the crowded guards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.