रमजान ईदनिमित्त बाजार फुलला...!
By Admin | Published: June 24, 2017 12:24 AM2017-06-24T00:24:10+5:302017-06-24T00:24:43+5:30
जालना : रमजान ईद सोमवारी साजरी होत असून, यानिमित्त खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : रमजान ईद सोमवारी साजरी होत असून, यानिमित्त खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी होत आहे. शुक्रवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची बाजारात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
ईद दोन दिवसांवर आली आहे. ईदसाठी शीरखुर्मा तयार करण्यासाठी सुका मेवा, नवीन कपडे, चप्पल, बूट, सौंदर्य प्रसाधने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. एक ते दीड कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. सुका मेव्यासाठी अरब देशातून साहित्य आल्याने यंदा शिरखुर्म्याचा स्वाद आणखी वाढण्याची वाढणार आहे. रमजानमध्ये प्रामुख्याने पेंडखजूर, शेवया, काजू, बदाम, अंजिरासह विविध फळांची आवक वाढली आहे. पेंडखजूरचे विविध दहा प्रकार उपलब्ध असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. प्रतिकिलोचे दर शंभर रूपयांपासून सातशे रूपये किलोपर्यंत आहेत. सोबतच केशर तसेच अन्य पदार्थांच्या विक्रीत वाढ झाली आहे.
ईद म्हटले की, नवीन कपड्यांची आवर्जून खरेदी करण्यात येते. बच्चे कंपनीपासून आबालवृद्धांपर्यंत कपडे खरेदीसाठी कपड्यांच्या दुकानात गर्दी वाढली आहे. ईदमुळे रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू राहत आहेत. विविध चित्रपटातील पोषाखांचीही मागणी वाढली आहे. पठाणी ड्रेसला सर्वात जास्त मागणी आहे. शुक्रवारी मीना बाजार भरण्याबाबत रस्त्याची पाहणी केली. परंतु याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले.