होळीच्या पर्वावर रंगीबेरंगी पळसफुलांनी बहरले रानशिवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:05 AM2021-02-25T04:05:41+5:302021-02-25T04:05:41+5:30
घाटनांद्रा : परिसरातील डोंगर-टेकड्या व रानोमाळी सध्या पळसाच्या झाडाने सर्वांना आकर्षित केले आहे. वसंत ऋतूच्या आगमनाला अजून ...
घाटनांद्रा : परिसरातील डोंगर-टेकड्या व रानोमाळी सध्या पळसाच्या झाडाने सर्वांना आकर्षित केले आहे. वसंत ऋतूच्या आगमनाला अजून उशीर असला तरी अखेरच्या टप्प्यात आलेल्या शिशिर ऋतूत वृक्षांची संपूर्ण पानगळ सुरू झाली आहे. पळस, काटेशेवरी हे वृक्ष आपल्या आकर्षक फुलांची उधळण करीत वसंत ऋतूच्या आगमनासाठी प्रतीक्षा करीत आहेत.
त्याचबरोबर आंब्याची झाडे मोहरली असून, त्याच्या सुगंधाने संपूर्ण रान सुगंधित केले आहे. तरीही या ऋतुचक्राच्या मनमोहक फुलांच्या अदाकारीने व बदललेल्या वातावरणामुळे सध्या उन्हाळी मशागतीच्या कामांना सुरुवात करू पाहणाऱ्या या बळिराजाला रानातील या फुलांची उधळण जगण्याची नवी उभारी देत आहे. रानावनांत दिसणारी लालबुंद रसरशीत पळसाची फुले आपल्याकडे आकर्षित करू लागले आहेत. निसर्गाच्या सुरू असलेल्या या फुलांच्या मनमोहक उधळण्याने रंगाची धुळवड अर्थात रंगपंचमी, होळी हा सण जवळ येऊ लागला असल्याची जाणीव बच्चे कंपनीला होऊ लागली आहे.
240221\img_20210218_145812_1.jpg
घाटनांद्रा परिसरात बहरलेले पळसाचे झाडे