हर्सूल जेलमध्ये राणाभाईला गुन्हेगारीचे ‘धडे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:31 AM2017-10-27T00:31:29+5:302017-10-27T00:31:42+5:30
हर्सूल जेलमध्ये त्याला सराईत गुन्हेगाराच्या कोठडीत टाकले. सराईत गुन्हेगाराने आपल्याकडील ‘सर्व गुण’ मित्राला बहाल केले. हेच मार्गदर्शन घेऊन कारागृहाबाहेर आल्यानंतर बनावट नोटा तयार करून कमिशनवर विकण्याचा प्रकार बीडमधील शेख शकूर ऊर्फ राणाभाई याच्या अंगलट आला
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : हर्सूल जेलमध्ये त्याला सराईत गुन्हेगाराच्या कोठडीत टाकले. तेथे घट्ट मैत्री झाली. सराईत गुन्हेगाराने आपल्याकडील ‘सर्व गुण’ मित्राला बहाल केले. हेच मार्गदर्शन घेऊन कारागृहाबाहेर आल्यानंतर बनावट नोटा तयार करून कमिशनवर विकण्याचा प्रकार बीडमधील शेख शकूर ऊर्फ राणाभाई याच्या अंगलट आला आहे. मध्यप्रदेश पोलीस पथकाने बुधवारी रात्री त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
कर्तारसिंह लक्ष्मीनारायणसिंह नटवरिया (भिंड, मध्यप्रदेश) हा शस्त्रास्त्रांसह पकडल्यामुळे हर्सूल जेलमध्ये होता, तर बनावट नोटा तयार करणारा बीडमधील राणाभाई हा नातेवाईकातील मुलीला पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी कारागृहात गेला होता. कर्तार हा सराईत गुन्हेगार आहे. कर्तार असलेल्या कोठडीतच अंबड येथील एक सराईत गुन्हेगार होता. या दोघांच्या कोठडीत बीडचा राणाभाई दाखल झाला. अनेक दिवस सोबत राहिल्यानंतर तिघांची घट्ट मैत्री झाली. कर्तारने राणाला बनावट नोटा तयार करण्याचा गुरुमंत्र दिला. कारागृहातून बाहेर पडताच राणाने हा गोरखधंदा सुरू केला.
लाख रुपयांच्या बनावट नोटा छापल्यानंतर तो मध्यप्रदेशातील कर्तारला पार्सल करायचा. लाखामागे त्याला ३० हजार रुपयांच्या चलनी नोटा मिळत असे. परंतु मध्यप्रदेश पोलिसांच्या हाती कर्तार रंगेहाथ पकडला गेला. बरोई (मध्यप्रदेश) पोलीस ठाण्याचे फौजदार मनीष जौदानी यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कंबर कसली. कर्तारला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने बनावट नोटा तयार करणाºया बीडमधील शकूरचा पत्ता सांगितला. त्यानुसार पेठबीड पोलिसांच्या मदतीने त्याच्या मुसक्या आवळल्या.
दोन महिन्यांत ५ लाख रुपयांच्या नोटांची छपाई
हा गोरखधंदा दोन महिन्यांपासून सुरू होता. जवळपास पाच लाख रुपयांच्या ५० व १०० रुपयांच्या बनावट नोटा शकूरने तयार केल्या होत्या. या सर्व नोटा कर्तारला पोहोच केल्यानंतर त्याचे कमिशनही शकूरला मिळाले होते, असे फौजदार मनीष जौदानी यांनी सांगितले.