रोगप्रतिकार शक्तीसाठी 'बूस्टर डोस' ठरणाऱ्या रानभाज्या बहरल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 07:50 PM2020-08-01T19:50:40+5:302020-08-01T19:56:08+5:30
अनेक जीवनसत्व असलेल्या रानभाज्या खाण्याकडे नागरिकांचा कल वाढला
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: अजिंठ्याच्या डोंगरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या रानभाज्या बहरल्या आहेत. अनेक जीवनसत्व असलेल्या या भाज्या खाण्याकडे आता लोकांचा कल वाढला आहे. कोणतीही औषधी फवारणी न करता नैसर्गिकरित्या डोंगरात, शेताच्या बांधावर उगवलेल्या या रानभाज्यांची खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना चांगलीच ओळख आहे. या भाज्यांवर ताव मारण्यासोबतच ते या नैसर्गिक देणगीचे जतन करताना ही दिसत आहेत.
अजिंठयाच्या कुशीत पावसाळ्यात अनेक रानभाज्या सर्वत्र उगवतात. श्रावणात तर या भाज्यांना बहर येतो. अजिंठा डोंगर रांगालगतचा भाग याबाबत अधिक समृद्ध आहे. पिपळदरी, हळदा, लेनापुर, वसई या भागात मोठ्याप्रमाणावर रानभाज्या आढळतात. त्यात चिंचु, कोलार, माठ, म्हैसवेल, हत्तीकान(ब्रम्हराक्षस) भांगरा, करटूले, कोका, मुरमुट्या, गुल चांदणी, फांद, अंबाडी, कुरडू, आघाडा, तांदुळजा, बांबचे कोंब, शतावरी, राजगिरा, तरोटा, घोळ अशा जवळपास 20 प्रकारच्या रानभाज्या सहज दिसून येतात. विशेष म्हणजे या भाज्या नैसर्गिकरित्या येत असून यावर कसल्याही प्रकारची कीटकनाशक फवारणी करण्यात येत नाही. यामुळेच अत्यंत पौष्टिक असण्यासोबतच या भाज्या सकसही आहेत.
रानभाज्या व त्याचे महत्व
1) तांदुळजा :- 'क' व 'अ' जीवनसत्व विपुल असून रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी उपयुक्त. उष्णता व दाह कमी करते, मलावरोध दूर करते.
2) फांद :- ही वेल वर्गीय असून याची पाने खाद्य असतात. पित्तविकार दूर करणारी, निद्रा येण्यासाठी उपयुक्त
3) अंबाडी :- 'क' व 'अ' जीवनसत्व, लोह, झिंक, कैल्शियम यात विपुल प्रमाणात असतात. गुणाने असून रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
४) म्हैसवेल :- 'अ' जीवनसत्व वाढवणारी, पोटाच्या विकारात लाभदायी
5) हत्ती कान :- यास ब्रम्हराक्षस म्हणुन ही ओळखले जाते. खुप दुर्मिळ असणाऱ्या या वनस्पतिचे शास्त्रीय नाव "लिया मैक्रोफायला " असे आहे. पित्तविकार दूर करणारी, पाचकता वाढविणारी.
6) कोलार :- रुचकर व मल स्वछ करणारी ,मुळव्याधीसाठी लाभदायक.
7) आघाडा :- गुणाने कडू, पाचक, उष्णता कमी करणारी, मूत्रातील आम्लता कमी करणारी.
8) घोळ :- थंड गुणांची, पचनास मदत करणारी.
9) चिंचु :- ही दुर्मिळ असणारी वनस्पति असून याच्या पानांची भाजी बनवतात. रुचकर, पचनास हलकी व जीवनसत्व व खनिजयुक्त आहे.
10) कुरडू :- शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. दमा व श्वास रोगत लाभदायी.