औरंगाबादमध्ये राणेंचा उमेदवार लढणार खैरेंविरुद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:09 PM2019-03-09T12:09:42+5:302019-03-09T12:12:58+5:30
औरंगाबादेतून सुभाष पाटील यांना उमेदवारी जाहीर
औरंगाबाद : लोकसभेसाठी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंविरुद्ध महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे मराठवाडा विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शुक्रवारी येथे जाहीर केला.
पत्रपरिषदेत नितेश राणे यांच्या उपस्थितीत उमेदवारीची घोषणा करून लगेच नारायण राणे हे रात्री विमानाने मुंबईकडे रवानाही झाले. याच वेळी स्वाभिमान पक्षाचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष म्हणून माजी महापौर सुदाम सोनवणे यांची नियुक्ती राणे यांनी जाहीर केली.
महाराष्ट्रात स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या एकूण पाच जागा लढविणार आहे. अन्य उमेदवार नंतर जाहीर करण्यात येतील. जिथे शिवसेना लढत आहे, तिथलेच हे उमेदवार असतील, असेही राणे यांनी स्पष्टपणे जाहीर करून टाकले.
पत्रकारांच्या विविध प्रश्नांना राणे यांनी ‘ राणे’ पद्धतीने उत्तरे दिली. स्वाभिमान पक्षाला पडणारी मते नरेंद्र मोदी यांनाच पडणारी असतील का, असे विचारता ते उत्तरले, असे समजायला हरकत नाही. अर्थात देशात पुन्हा भाजपचीच सत्ता येईल. दोनशे तरी जागा भाजपला मिळतील. पंतप्रधान कोण होईल, हे आताच सांगता येणार नाही.
आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अन्य उमेदवार जाहीर होतील व पक्षाचे चिन्हही येत्या आठ दिवसांत मिळेल, असे सांगून येथे चंद्रकांत खैरे यांना पाडायचंय’ अशा शब्दात त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.
कॉंग्रेसमध्ये असताना तुम्ही खैरेंची सरपंच होण्याचीही लायकी नाही, असं म्हणाला होता, अशी आठवण करून देताच, हो तुमची इच्छा असल्यास मी पुन्हा तसं म्हणायला तयार आहे, असे उत्तर राणे यांनी दिले. बहुचर्चित शांतीगिरी महाराज हेही नाशिकमधून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार होऊ शकतात, हे त्यांनी नाकारले नाही.
मराठवाडा विकास सेना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाबरोबर राहणार असल्याची ग्वाही यावेळी सुभाष पाटील यांनी दिली. पत्रपरिषदेस रमेश सुपेकर, सदानंद शेळके, पद्मा शिंदे, मंजू देशमुख, किशोर पाटील, नीलेश भोसले आदींची उपस्थिती होती. भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड यांच्या निवासस्थानी चहापान झाल्यानंतर नारायण राणे हे रात्री मुंबईकडे रवाना झाले.
वंचित बहुजन आघाडीबद्दल काही मत नाही.....
वंचित बहुजन आघाडीबद्दल आपलं काय मत आहे, असं विचारता, राणे म्हणाले, माझं काहीही मत नाही. अशा आघाड्या होत असतात. त्याबद्दल आताच काही बोलणे योग्य होणार नाही. भाजप- सेनेची युती झाली असली तरी माझी भाजपबरोबर जाहीर युती आहे. मी भाजपचा सहयोगी सदस्य आहे. भाजपच्या कोट्यातील राज्यसभा सदस्यही आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सत्तेसाठी नाईलाजास्तव युती
भाजप- सेनेच्या युतीबद्दल राणे यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘नाईलाजास्तव केवळ सत्तेसाठी भाजप- सेनेची युती झालेली आहे. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना, अशी यांची गत होती. गेली साडेचार वर्षे शिवसेना नरेंद्र मोदींवर व भाजपवर टीका करीत होती आणि आता सत्तेसाठी ते जवळ आले आहेत. साडेचार वर्षांत शिवसेनेने काहीही केले नाही. नाणार जाण्याचे यशही आमचे आहे म्हणून तर आम्ही फटाके वाजवून स्वागत केले. नाणार आणणारेही शिवसेनेवाले आणि रद्द करणारेही शिवसेना, अशी टीका राणे यांनी केली. मला युतीत जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे प्रयत्न करण्याचीही गरज भासली नाही, असेही त्यांनी नमूद केले.