सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील रंजना, प्रतिभा वाघिणी अहमदाबादला रवाना; कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर
By मुजीब देवणीकर | Published: February 20, 2023 04:34 PM2023-02-20T16:34:31+5:302023-02-20T16:35:02+5:30
जड अंत:करणाने निरोप; वाघिणींसह सहा काळविटेही अहमदाबादला रवाना
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील रंजना आणि प्रतिभा या दोन वाघिणी रविवारी सकाळी अहमदाबादकडे रवाना झाल्या. त्यांच्यासोबत सहा काळवीटही पाठविण्यात आले. प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी वाघिणींना जड अंत:करणाने निरोप दिला.
प्राणिसंग्रहालयातच जन्मलेल्या दोन्ही वाघिणींचा कर्मचाऱ्यांना बराच लळा हाेता. अहमदाबाद येथील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयाने औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयाला १० सायाळ, २ इमू, ३ कोल्हे, ६ स्पूनबिल हे पशुपक्षी दिले. त्या बदल्यात दोन वाघिणी आणि काळवीट देण्याचे आदेश केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दिले होते. रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास प्रतिभा आणि रंजना यांच्या ‘घरा’समोरच पिंजरे लावण्यात आले. अगोदर प्रतिभा वाघिणीला पिंजऱ्यात सोडण्यात आले. त्यानंतर रंजनाला पिंजऱ्यात सोडले. वाघिणी पिंजऱ्यात येताच दरवाजा बंद करून हे पिंजरे वाहनाकडे घेऊन जात असताना वाघिणींनी डरकाळ्या फोडल्या. पिंजऱ्यात गोल फिरताना सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे वाघिणी एकटक पाहत होत्या. मनपा कर्मचाऱ्यांचेही डोळे पाणावले.
पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळ
वाघिणींचे केअर टेकर मोहंमद झिया, सोमनाथ मोटे, रज्जाक कुरेशी, शुभम साळुंके, मोहंमद जाफर, भागीनाथ म्हस्के, जयसिंग चव्हाण यांना दोन्ही वाघिणींचा लळा लागला होता. त्यांच्या एका आवाजावर त्या ‘घरा’तून बाहेर येत असत. दररोजचे जेवण हेच कर्मचारी देत होते. प्राणिसंग्रहालयातच जन्मलेल्या या वाघिणींना कर्मचाऱ्यांनी पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळले. दोघींना नेत असताना कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.
आठ जणांचे पथक
अहमदाबाद येथील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयाचे सहायक अधीक्षक राजेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली आठ जणांचे पथक वाघिणी नेण्यासाठी आले होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर, वनपरिक्षेत्र अधिकारी तौर, सल्लागार डॉ. बी. एस. नाईकवाडे, प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी शेख शाहेद, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नीतीसिंग चौहान, पशुधन पर्यवेक्षक संजय नंदन आदींची उपस्थिती होती.
ताशी ५० चा वेग ठेवणार
औरंगाबाद ते अहमदाबाद ६२६ किलोमीटर अंतर आहे. वेगाने वाहन चालविले तर वाघीण, काळवीट ‘शॉक’मध्ये जाऊ शकतात. त्यामुळे ताशी ५० किमीच्या वेगाने पथक प्रवास करीत आहे. दर चार तासांनंतर थोडेसे थांबून प्राण्यांना पाणी देण्यात येते. औरंगाबादहून निघण्यापूर्वी दोन्ही वाघिणींना जेवण देण्यात आले. अहमदाबादच्या पथकाने या प्राण्यांचे जेवणही सोबत नेले आहे.