जमीन विक्रीनंतर ताबा देण्यासाठी मागितली ५० लाखांची खंडणी, प्राध्यापकासह कुटुंबावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 05:32 PM2022-03-10T17:32:44+5:302022-03-10T17:33:09+5:30

प्लॉट नियमबाह्यपणे खरेदी केल्याची तक्रार गृहमंत्र्यांकडे करण्यात आली होती.त्यानुसार झालेल्या चौकशीत प्लॉट नियमानुसार खरेदी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

Ransom of Rs 50 lakh demanded for possession after sale of land, crime against family including professor | जमीन विक्रीनंतर ताबा देण्यासाठी मागितली ५० लाखांची खंडणी, प्राध्यापकासह कुटुंबावर गुन्हा

जमीन विक्रीनंतर ताबा देण्यासाठी मागितली ५० लाखांची खंडणी, प्राध्यापकासह कुटुंबावर गुन्हा

googlenewsNext

औरंगाबाद : नारळीबाग येथील ७ हजार ६५० स्क्वेअर फुटांचा प्लॉट खरेदी करणाऱ्या चौघा जणांना, ताबा देण्यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सेवानिवृत्त प्राध्यापकासह त्याच्या तीन मुलांच्याविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात खंडणीसह इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा प्लॉट नियमबाह्यपणे खरेदी केल्याची तक्रार गृहमंत्र्यांकडे करण्यात आली होती.त्यानुसार झालेल्या चौकशीत प्लॉट नियमानुसार खरेदी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरच हा गुन्हा नोंदविण्यात आला.

आरोपींमध्ये तानाजी पिराजी तायडे, ॲड. राहुल तानाजी तायडे, प्रा. प्रसेनजीत तानाजी तायडे आणि लोकेश तानाजी तायडे (सर्व रा. नारळीबाग) यांचा समावेश आहे. सिटी चौक पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, रोशन किसन अवसरमल, योगेश उत्तमराव पाथ्रीकर, आप्पासाहेब शिवाजी साबळे आणि बालाजी गणपतराव हेबारे हे चौघे मित्र असून, त्यांनी नारळीबाग येथील सर्व्हे नंबर २९४० मधील ७ हजार ६५० स्क्वेअर फुटांचा प्लॉट सेवानिवृत्त प्राचार्य प्रभाकर पिराजी तायडे यांच्याकडून ८० लाख रुपयांत खरेदी केला. दुय्यम निबंधक कार्यालयात प्रा. प्रभाकर तायडे आणि त्यांच्या पत्नी भारती तायडे यांनी ३ मे २०१९ रोजी चार खरेदीदारांना खरेदीखत करून दिले. ठरलेल्या व्यवहाराचे ८० लाख रुपये धनादेश आणि आरटीजीएसद्वारे मालक तायडे यांना देण्यात आले. खरेदीचा व्यवहार झाल्यानंतर चौघांनी प्लॉटवर स्वच्छता करीत मालकीचा लोखंडी बोर्डही लावला. या सर्व घटनेनंतर ४ मार्च २०२० रोजी खरेदीदार प्लॉटवर बांधकाम करण्याच्या अनुषंगाने गेल्यानंतर आरोपी असलेल्या चौघांनी, तुम्ही या ठिकाणी येऊ नका, ही जागा शिवाजी महाराज लोककल्याणकारी संस्थेची आहे, असे सांगितले. त्यावेळी वादावादी झाल्यानंतर १४ जून २०२० रोजी खरेदीदार प्लॉटवर गेले, तेव्हा त्यांना संस्थेच्या मालकीच्या जागेचा बोर्ड लावल्याचे दिसून आले. खरेदीदार कंपाैंडचे गेट उघडून आत जात असतानाच आरोपींनी पुन्हा धमकी देत प्लॉटवर येऊ नका, यायचे असेल तर ५० लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली.

तसेच पुन्हा इकडे फिरकल्यास हातपाय तोडून टाकून, ॲट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी दिली. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतरही अनेक वेळा प्लॉटवर ताबा हवा असेल तर ५० लाखांच्या खंडणीची मागणी केली. ७ मार्च २०२२ रोजी खरेदीदार प्लॉटवर गेल्यानंतर पुन्हा तायडे कुटुंबांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक चाबूकस्वार करीत आहेत.

प्लॉट विकणारे अन् खंडणी मागणारे नातेवाईक
चार जणांना प्लॉटची विक्री करणारे सेवानिवृत्त प्रा. प्रभाकर तायडे आणि ५० लाख रुपयांच्या खंडणीचा गुन्हा दाखल झालेले प्रा. तानाजी तायडे हे भाऊ आहेत. उर्वरित तीन आरोपी हे तानाजी तायडे यांची मुले आहेत. भावाने विकलेल्या प्लॉटवर दुसरा भाऊ आणि त्यांच्या मुलांनी आक्षेप घेतलेला आहे.

गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

स्वाभिमानी मराठवाडा युवक प्रतिष्ठानचे संस्थापक प्रमुख गौतम आमराव यांनी प्रा. प्रभाकर तायडे यांची नारळीबाग येथील प्लॉटसह इतर मालमत्ता परस्पर विकली असून, त्या प्रकरणात चौकशी करावी, अशी मागणी करणारे निवेदन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ८ फेब्रुवारी २०२२ रोजी दिले. त्यावर गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्याकडे निवेदन पाठवत आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ईओडब्ल्यूचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांनी चौकशी केली आहे. या चौकशीचा अहवाल प्रभारी निरीक्षक अविनाश आघाव यांच्यामार्फत आयुक्तांना सादर करण्यात आला. त्यामध्ये संबंधित तक्रारीत कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे समोर आल्यानंतर खरेदीदारांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा नोंदविल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Ransom of Rs 50 lakh demanded for possession after sale of land, crime against family including professor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.