'आरटीआय'च्या आडून खंडणी; बिल्डरकडून १५ लाख घेताना एकास रंगेहाथ अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 12:02 PM2021-07-08T12:02:12+5:302021-07-08T12:02:48+5:30
हिलाल कॉलनीच्या पाठीमागे बिल्डरने जमीन घेतली होती, त्याचा फेर घेण्याची प्रक्रिया सुरू होती.
औरंगाबाद : जमिनीचा फेर घेण्याची प्रक्रिया सुरू असताना माहिती अधिकारात वारंवार अर्ज करून अडथळे आणल्यानंतर जमीन मालकाकडे तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला सिटी चौक पोलिसांनी सापळा लावून बुधवारी रात्री अटक केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सिटी चौक पोलिसांनी सांगितले की, आरेफ कॉलनी येथील रहिवासी शेख मोहंमद साबेर शेख मोहंमद शरीफ यांचा प्लॉटिंग आणि बिल्डर्सचा व्यवसाय आहे. हिलाल कॉलनीच्या पाठीमागे साबेर यांनी जमीन घेतली. या जमिनीचा फेर घेण्याची प्रक्रिया सुरू होती. मिर फखर अली जद्दी (५०) याने फेर होऊ नये यासाठी माहिती अधिकार कायद्यांतर्गत तक्रारी सुरू केल्या. त्यामुळे साबेर यांच्या कामात अडथळा निर्माण होत होता. तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी फखर तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी मागत होता. त्रस्त साबेर यांनी सिटी चौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
बुधवारी रात्री फखर याला रक्कम घेण्यासाठी टाऊन हॉल भागात बोलावण्यात आले. १५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना फखर याला सिटी चौक पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यापूर्वी सरकारी पंचांसमोर फखर याने खंडणीची मागणी केली होती. रात्री उशिरापर्यंत सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक खटाणे, सय्यद मोहसीन यांनी केली. माहिती अधिकारात आणखी काही नागरिकांना फखर याने ब्लॅकमेलिंग केली आहे का? याची चाचपणी पोलीस करीत आहेत.