औरंगाबादमध्ये रेल्वे पीटलाइन, विमानतळाच्या विस्तारातही अडचणी: रावसाहेब दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 12:05 PM2022-02-23T12:05:57+5:302022-02-23T12:06:37+5:30
औरंगाबादला तर होणारच, सोबत जालन्यात स्वतंत्र शंभर कोटींची पीटलाइन होणार
जालना : औरंगाबादची पीटलाइन जालन्याला आणलेली नाही. ती औरंगाबादलाच होणार आहे; परंतु रेल्वेची स्वत:ची जागा नसल्याने अडचणी येत आहेत. औरंगाबादच्या विमानतळाचा विस्तार करावयाचा आहे. त्यालाही जागेचा प्रश्न निर्माण होत आहे. जालन्यात मात्र स्वतंत्र शंभर कोटींची पीटलाइन होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिली.
जालना येथे मंगळवारी ‘लोकमत आयकॉन ऑफ एज्युकेशन अवॉर्ड’च्या वितरण सोहळ्यात ते बाेलत होते. जालना ते जळगाव हा रेल्वेमार्ग शंभर टक्के होणार आहे. याच्या सर्वेक्षणासाठी टेंडर पास झाले आहे. हा मार्ग चारही विधानसभा मतदारसंघांतून जाणार आहे. शिवाय अहमदनगर, बडोदा, सुरत, बेंगलोर मार्गावर रेल्वे धावणार आहे. मनमाड ते नांदेड मार्गावर इलेक्ट्रिफिकेशनचे काम सुरू आहे. २०२३ नंतर रेल्वे विद्युतवर चालणार असल्याची माहितीही यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. औरंगाबाद येथील रेल्वे पीटलाइन आणि विमानतळाच्या विस्तारीकरणाचे नियोजन आहे; परंतु स्वत:ची जागा नसल्याने अडचणी येत आहेत. जागा खरेदी करून पीटलाइन किंवा विमानतळाचे विस्तारीकरण करायचे म्हटले तर खर्च दुप्पट होणार असल्याचे दानवे म्हणाले.
लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. फुलंब्री-राजूर मार्गासाठी ८५ कोटींचा निधी मंजूर आहे. जालना-राजूर मार्गासाठी २६० कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचेही यावेळी दानवे यांनी नमूद केले. कार्यक्रमास आमदार नारायण कुचे, अक्षय गोरंट्याल, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल, शिक्षणतज्ज्ञ बी.वाय. कुलकर्णी, बियाणे उद्योजक सुरेश अग्रवाल, ‘लोकमत’चे संपादक नंदकिशोर पाटील आदींची उपस्थिती होती.