रावसाहेब दानवेंच्या कन्येचा शिंदेसेनेत प्रवेश, कन्नडमधून विधानसभा उमेदवारी पक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 06:17 PM2024-10-28T18:17:30+5:302024-10-28T18:18:36+5:30
गेल्या काही दिवसांपासून महायुतीची कन्नड येथील जागा कोणाला सुटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
छत्रपती संभाजीनगर : भाजपचे नेते तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेकडून त्यांची उमेदवारी जवळपास पक्की झाली आहे.
महाविकास आघाडीत कन्नड येथील जागा उद्धवसेनेला सुटली असून, विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत यांना उमेदवारी मिळाली आहे. त्याच वेळी गेल्या काही दिवसांपासून महायुतीची कन्नड येथील जागा कोणाला सुटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कन्नडची जागा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. याच एका मुद्यावर महायुतीत कन्नडची जागा शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आली. संजना जाधव या शिंदेसेनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करत होत्या. दोन दिवस त्या मुंबईत ठाण मांडून होत्या. अखेर पक्षप्रवेशामुळे शिंदेसेनेकडून त्यांची उमेदवारी आणि धनुष्यबाण निशाणीवर त्या कन्नडमधून निवडणूक लढणार असल्याचे पक्के झाले. शिंदेसेनेकडून त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याने कन्नडमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. संजना जाधव यांच्या शिंदेसेनेत प्रवेश होण्यापूर्वी रावसाहेब दानवे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना
शिवसेनेमध्ये फूट झाल्यानंतरही उदयसिंह राजपूत हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले. त्यामुळे उद्धवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. आता राजपूत यांच्यासमोर जाधव यांचे आव्हान उभे आहे.