'विशेष निमंत्रण पत्रिके'वरून रावसाहेब दानवेंचे नाव तर कार्यक्रमातून महाविकास आघाडी गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 03:41 PM2022-03-02T15:41:32+5:302022-03-02T15:43:29+5:30
हर घर गॅस अभियान प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यास जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील आमदार, तसेच खासदार इम्तियाज जलील यांची पाठ
औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये आज सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास हर घर गॅस या अभियान या २ हजार कोटींच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत पार पडले. मात्र, या कार्यक्रमास एमआयएम खासदार इम्तियाज जलील आणि जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील आमदारांनी पाठ फिरवली. तर विशेष निमंत्रण पत्रिकेवरून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव गायब असल्याने एकच चर्चा रंगली
मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी ऑनलाईन सहभागी झाले. केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, आ. प्रशांत बंब यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, कार्यक्रमस्थळी केवळ भाजपच्याच आमदारांची उपस्थिती दिसत होती.
भाजपने या भूमिपूजन कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरात चांगलेच शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले. प्रत्येक वार्डातून भाजपचे कार्यकर्ते कार्यक्रमासाठी जात होते. विशेष म्हणजे, कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शिवसेनेसोबत युती तुटल्यानंतर शहरात प्रथमच एवढ्या मोठा कार्यक्रमाचे नियोजन भाजपतर्फे करण्यात आले होते.
हे होते अनुपस्थित
कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर पालकमंत्री सुभाष देसाई, कॅबीनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, उदयसिंग राजपूत, रमेश बोरनारे, राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, विक्रम काळे यांची नावे होती. मात्र, कार्यक्रमास हे सर्व अनुपस्थित राहिले.