विवाहितेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पती, सासू आणि सासऱ्याला सश्रम कारावास, दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 10:34 PM2019-06-11T22:34:22+5:302019-06-11T22:35:23+5:30
घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहिता उज्ज्वला हिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तिचा पती अनिल अण्णा जाधव, सासू शोभाबाई अण्णा जाधव व सासरा अण्णा ओंकार जाधव यांना मंगळवारी (दि. ११) सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावास आणि ११ हजार रुपये दंड ठोठावला.
औरंगाबाद : घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहिता उज्ज्वला हिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तिचा पती अनिल अण्णा जाधव, सासू शोभाबाई अण्णा जाधव व सासरा अण्णा ओंकार जाधव यांना मंगळवारी (दि. ११) सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावास आणि ११ हजार रुपये दंड ठोठावला.
यासंदर्भात उज्ज्वलाचे वडील गजानन सूर्यभान जामोदे (४४, रा. अंभोरा, ता. नांदुरा, जि. बुलडाणा) यांनी फिर्याद दिली होती की, उज्ज्वला हिचे लग्न अनिल जाधव (२७, रा. आमखेडा, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) याच्याशी ७ मार्च २०१५ रोजी झाले. लग्नावेळी फिर्यादीने सासरच्या मंडळीला दीड लाख रुपये हुंडा दिला. लग्नानंतर काही दिवसांनी घर बांधायचे म्हणून दोन लाख रुपये माहेरून घेऊन येण्यासाठी सासरची मंडळी तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याचे तिने वडिलांना सांगितले होते. छळाला कंटाळून उज्ज्वलाने ९ आॅगस्ट २०१५ रोजी विष पिऊन आत्महत्या केली होती.
यासंदर्भात सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याच्या सुनावणीवेळी, सहायक सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात फिर्यादीसह त्यांचा भाऊ प्रशांत गजाजन जामोदे, चुलत भाऊ बळीराम निवृत्ती जामोदे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने पती अनिल, सासू शोभाबाई व सासरा अण्णा जाधव यांना भादंवि कलम ३०६ अन्वये प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड आणि भादंवि कलम ४९८ (अ) अन्वये तिघांना प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड ठोठावला.