स्वत:च्या मुलीवर अत्याचार; आईने धाडसाने दिली तक्रार, पित्याला २० वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 07:42 PM2022-01-04T19:42:50+5:302022-01-04T19:44:13+5:30
शहरात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकरणात पीडितेच्या आईने फिर्याद दिली होती
औरंगाबाद : स्वत:च्या १३ वर्षांच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या मद्यपी पित्याला सत्र न्यायाधीश आर. एस. निंबाळकर यांनी पोक्सो कायद्याखाली २० वर्षे सश्रम कारावास आणि ४० हजार रुपये दंड ठोठावला. दंडाचे ४० हजार रुपये पीडितेला भरपाई म्हणून देण्याचेही आदेशात नमूद केले आहे. विशेष म्हणजे या खटल्यात पीडितेच्या आईनेच आरोपी पतीविरुद्ध तक्रार दिली होती.
शहरात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकरणात पीडितेच्या आईने फिर्याद दिली होती की, २७ जानेवारी २०१९ च्या रात्री ती आणि तिची मुले घरात झोपली होती. मध्यरात्री लहान मुलगा रडू लागल्याने आईने त्याला घराबाहेर फिरविण्यासाठी नेले. मुलीने घराचा दरवाजा आतून लावून घेतला. थंडीमुळे दार लावल्याचे वाटून आईने दुर्लक्ष केले. काही वेळाने आल्यावर शंका आल्याने तिने घरात जाऊन पाहिले असता, आरोपी पती हा अर्धवट कपड्यांवर दिसला.
मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता, हात-पाय दाबून घेण्यासाठी पित्याने मुलीला बोलावले जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचे तिने आईला सांगितले. आतापर्यंत तीन ते चारवेळा अत्याचार केल्याचेही तिने आईला सांगितले. वैद्यकीय तपासणीत अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महिलेने तक्रार दिली होती. एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यात फिर्यादी, डॉक्टर तसेच मुख्याध्यापकाची साक्ष महत्त्वाची ठरली.