डेंग्यू रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
By Admin | Published: September 11, 2014 01:21 AM2014-09-11T01:21:37+5:302014-09-11T01:21:45+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात डेंग्यूची साथ जोरात सुरू आहे. डेंग्यूमुळे आतापर्यंत दहा जणांचे बळी गेले आहेत.
औरंगाबाद : औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात डेंग्यूची साथ जोरात सुरू आहे. डेंग्यूमुळे आतापर्यंत दहा जणांचे बळी गेले आहेत. डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण प्रत्येक गल्लीबोळात दिसत असल्याने शहरातील सर्व खाजगी रुग्णालये आणि आयसीयू डेंग्यूच्या रुग्णांनी फुल झाले आहेत. घाटी रुग्णालयातही दाखल होणाऱ्या डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या तिपटीने वाढली आहे. तीन महिन्यांत घाटीत दाखल झालेल्या ५४७ रुग्णांपैैकी १४८ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे अहवालात समोर आले आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश मगरे यांनी सांगितले की, डेंग्यूसदृश रुग्णांची रोज नव्याने भर पडत आहे. मे महिन्यात ६३ डेंग्यूसदृश रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी ७ जणांना डेंग्यू झाल्याचे समोर आले होते. जूनमध्ये ५८ रुग्ण घाटीत दाखल झाले होते. त्यापैकी १८ रुग्णांचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आला होता. जुलै महिन्यात रुग्णांची संख्या दुप्पट १०५पर्यंत वाढली. या रुग्णांची रक्ततपासणी केली असता ३१ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. तर आॅगस्टमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे २५४ रुग्ण घाटीत दाखल झाले. यापैकी ९१ जणांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले होते. डेंग्यूच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने महानगरपालिका आणि ग्रामीण आरोग्य विभाग यांच्याकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे यावरून पुन्हा सिद्ध होते.
थंडी-ताप आल्यानंतर रुग्णाला तातडीने डॉक्टरांकडे घेऊन जावे. त्याच्या रक्ताची तपासणी करून घ्यावी, असा सल्ला डॉ. मगरे यांनी दिला.