दुष्काळ पाहणीचा वेगवान आढावा; ५० मिनिटांत चार गावांची पाहणी करून परतले केंद्रीय पथक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 12:51 PM2023-12-14T12:51:39+5:302023-12-14T13:00:52+5:30

छत्रपती संभाजीनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झालेला आहे.

Rapid review of drought monitoring; The central team returned after inspecting four villages within 50 minutes | दुष्काळ पाहणीचा वेगवान आढावा; ५० मिनिटांत चार गावांची पाहणी करून परतले केंद्रीय पथक

दुष्काळ पाहणीचा वेगवान आढावा; ५० मिनिटांत चार गावांची पाहणी करून परतले केंद्रीय पथक

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील तुळजापूर, मोरहिरा, खामखेडा, डोनवाडा या चार गावांमध्ये बुधवारी सकाळी १० वाजता केंद्रीय कृषी मंत्रालयातील दोन सदस्यीय पथक पोहोचले. यावेळी त्यांनी दुष्काळाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. चारही गावांमध्ये अवघ्या ५० मिनिटांत दुष्काळाचा आढावा घेऊन पथकाने आपला दौरा सोयगावकडे वळवला.

छत्रपती संभाजीनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झालेला आहे. या तालुक्यात दुष्काळाची काय स्थिती आहे, याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयातील ए. एल. वाघमारे, हरिश हुंबर्जे हे दोन अधिकारी आले होते. बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून पथकाने छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील गावांमध्ये कपाशी, मका, शेततळे, पाझर तलाव, मुरघास आदी पाहणी करून माहिती जाणून घेतली. या पथकासोबत अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार रमेश मुनलोड, तालुका कृषी अधिकारी गुळवे, गटविकास अधिकारी मीना रावताळे, पोनि. रवींद्र निकाळजे आदी होते.

या गावांत दिली भेट
- या पथकाने तुळजापूर येथील शेतकरी परमेश्वर जगदाळे यांच्या शेतात जाऊन कपाशीची पाहणी केली. येथे ते ९ मिनिटे थांबले.

- मोरहिरा गावात पथक थेट शेतकरी रामा कुटे यांच्या शेतात गेले. तेथेही त्यांनी कपाशी पिकाची सुमारे १२ मिनिटे पाहणी केली. यावेळी त्यांनी संवाद साधला, तेव्हा शेतकरी रामा कुटे म्हणाले की, माझी दीड एकर शेती आहे. गतवर्षी ९ क्विंटल कापसाचे उत्पादन निघाले. यंदा मात्र केवळ दीड क्विंटल कापूस झाला असून, खर्चही निघाला नाही.

- खामखेडा येथील पुष्पा जनार्दन मुठे व गणेश विश्वनाथ मुठे यांच्या शेतात पथकाने कपाशी, मका पिकाची पाहणी केली. शेततळे पहिले. सुभाष तुकाराम मुठे यांच्या घरासमोर ठेवलेल्या मुरघासची पाहणी करून माहिती जाणून घेतली. येथे १६ मिनिटे पथक होते. यावेळी शेतकरी गणेश मुठे यांनी अधिकाऱ्यांच्या हातात मक्याची सुकलेली कणसे देऊन, पाहा यात काही आहे का? असा प्रश्न विचारला, तेव्हा अधिकारी नुसते पाहात राहिले.

- तीन गावांतील पाहणीनंतर पथक डोनवाडा येथे पोहोचले. तेथे शेतकरी पंकज भागवत यांच्या शेतात कपाशीची पाहणी केली. तसेच त्यांच्याकडून उत्पादनाबाबत माहिती जाणून घेतली. येथे पथक १३ मिनिटे होते.

सुभेदारी विश्रामगृहातून प्रस्थान
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सावंगी-तुळजापूर, चौका, मोरहिरा, धनवड या गावांतील शेतात जाऊन शेतकऱ्यांशी काही मिनिटे संवाद साधून पथकाने सोयगाव तालुक्यातील जंगल तांडा, फर्दापूर, धनवट या गावांकडे प्रस्थान केले. सुभेदारी विश्रामगृहातून सकाळी ९ वाजता दुष्काळ पाहणीसाठी पथकाचा ताफा निघाला. ५ ते १० मिनिटे प्रत्येक नियोजित गावांना भेट देऊन पथकाने धावता आढावा घेतला.

सोयगाव तालुक्यात तीन गावांत पाहणी
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुष्काळ पाहणी झाल्यानंतर केंद्रीय पथक १२:३० वाजण्याच्या दरम्यान सोयगाव तालुक्यात दाखल झाले. ८० मिनिटांच्या पाहणीत त्यांनी जंगला तांडा, फर्दापूर तांडा, धनवट या तीन गावांत पाहणी केली.

यावेळी पथकासोबत जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, परतूरचे उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे, तहसीलदार मोहनलाल हरणे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Rapid review of drought monitoring; The central team returned after inspecting four villages within 50 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.