राखी बांधल्यानंतर पाचव्याच दिवशी अल्पवयीन मुलीवर तरुणाचा बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 06:19 PM2020-02-08T18:19:34+5:302020-02-08T19:59:37+5:30
घटनेवेळी आरोपी मुलीला घेऊन जाताना पाहिलेल्या शेजारी महिलेची साक्ष महत्त्वाची ठरली.
औरंगाबाद : इयत्ता सातवीतील मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या परिचित तरुणाला शुक्रवारी (दि.७) अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एस. देशपांडे यांनी आजन्म कारावासाची शिक्षा (नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप) आणि २० हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची संपूर्ण रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचेही आदेशात म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे शिक्षा झालेल्या तरुणाने पीडित मुलीकडून राखी बांधून घेतल्याच्या पाचव्याच दिवशी व त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
यासंदर्भात पीडितेने फिर्याद दिली होती की, १२ आॅगस्ट २०१७ रोजी तिचे आई-वडील बाहेरगावी गेले होते व भाऊ दहीहंडीच्या सरावासाठी बाहेर गेला होता. रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ती घराच्या खाली आली. त्यावेळी तिचे काका-काकू जेवण करीत होते. आरोपीने इशारा करीत तिला बोलावले आणि तो राहत असलेल्या घराच्या गच्चीवर जबरदस्ती नेऊन जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. विशेष म्हणजे घटनेच्या पाच दिवसांपूर्वीच (दि.७ आॅगस्ट २०१७) आरोपीने पीडितेकडून राखी बांधून घेतली होती. तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता, घडलेला प्रकार तिने सांगितला. मुलीच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुनावणीअंती न्यायालयालयाने आरोपीला भा.दं.वि.च्या कलम ३६३ अन्वये ५ वर्षे सक्तमजुरी व २,५०० रुपये दंड, कलम ३७६ (२)(ल) अन्वये मरेपर्यंत जन्मठेप (नैसर्गिक मृत्यूपर्यंत) व १५ हजार रुपये दंड आणि कलम ५०६ अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व २,५०० रुपये दंड ठोठावला. आरोपीला ‘पोक्सो’ कायद्याच्या कलम ६ अन्वये दोषी ठरविण्यात आले; परंतु या कायद्यातील कलम ४२ मधील तरतुदीनुसार त्यासाठी वेगळी शिक्षा ठोठावली नाही. पोलीस उपनिरीक्षक एस.बी. कोते यांनी तपास केला, तर पैरवी अधिकारी म्हणून यू.एच. तायडे यांनी काम पाहिले. अॅड. आहेर यांना अॅड. युवराज फुन्ने यांनी साहाय्य केले.
यांची साक्ष ठरली महत्त्वाची
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी ८ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये पीडित मुलीसह तिची आई, डॉक्टर तसेच घटनेवेळी आरोपी मुलीला घेऊन जाताना पाहिलेल्या शेजारी महिलेची साक्ष महत्त्वाची ठरली.