‘तौउते’च्या तडाख्यातून वाचण्यासाठी दुर्मीळ ‘छोटा चोर’ आला मराठवाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 07:23 PM2021-05-22T19:23:40+5:302021-05-22T19:28:43+5:30

तौउते चक्रीवादळाच्या तडख्यामुळे सुरक्षित ठिकाणी येलदरी धरणाच्या ठिकाणी आला असावा, असे पक्षीमित्रांनी सांगितले.

Rare 'little thief' Crow came to Marathwada to escape the onslaught of 'Tauktae ' cyclone | ‘तौउते’च्या तडाख्यातून वाचण्यासाठी दुर्मीळ ‘छोटा चोर’ आला मराठवाड्यात

‘तौउते’च्या तडाख्यातून वाचण्यासाठी दुर्मीळ ‘छोटा चोर’ आला मराठवाड्यात

googlenewsNext
ठळक मुद्देयेलदरी जलाशयाच्या परिसरात आढळला दुर्मीळ ‘छोटा चोर’दुर्मीळ ‘छोटा चोर’ या पक्षाची मराठवाड्यातील पहिली नोंद ‘तौउते’च्या तडाख्यातून वाचण्यासाठी घेतली धाव

- विजय चोरडिया
जिंतूर (परभणी )  : समुद्र काठावर आढळणारा ‘छोटा चोर’ कावळा ‘तौउते’च्या तडाख्यातून वाचण्यासाठी येलदरी धरणाच्या परिसरात सुरक्षित ठिकाणी भटकंती करताना आढळून आला. या पक्ष्याची नोंद पक्षीमित्र गणेश कुरा यांनी २१ मे रोजी घेतली आहे. तौउते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे सुरक्षित ठिकाणी येलदरी धरणाच्या ठिकाणी आला असावा. मराठवाड्यात पहिल्यांदाच हा कावळा आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे.

हा नेहमीपेक्षा वेगळा पक्षी येलदरी धरणाच्या जलाशय परिसरात उडत असताना पक्षी निरीक्षकांना दिसला. ई-बर्डच्या नोंदीनुसार भारतात या पक्ष्याच्या खूप कमी नोंदी आहेत. मराठवाड्यातील ही पहिलीच नोंद आहे. पक्षीमित्र, पक्षी अभ्यासकांसाठी खूप महत्त्वाची नोंद झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. तौउते चक्रीवादळाच्या तडख्यामुळे सुरक्षित ठिकाणी येलदरी धरणाच्या ठिकाणी आला असावा, असे पक्षीमित्रांनी सांगितले. या पक्षाचे मराठी नाव ‘छोटा चोर कावळा’ असून, फ्रिगाटे बर्ड कुटुंबातील फ्रेगेटिडाईच्या कुळातील हा समुद्री पक्षी आहे. सुमारे ७५ सें.मी. (३० इंच) लांबीची, ही फ्रिगेटबर्डची सर्वांत लहान प्रजाती आहे. हा पक्षी भारतीय आणि प्रशांत महासागराच्या, तसेच ब्राझीलच्या अटलांटिक किनाऱ्‍यावरील उष्ण कटिबंधीय वातावरणात वास्तव्यास असतो.

छोटा चोर कावळा एक हलका अंगभूत समुद्री पक्षी आहे. ज्यात तपकिरी- काळा पिसारा, लांब अरुंद पंख आणि खोलवर काटेरी शेपटी असते. नरला एक लाल रंगाची सामान्य पिशवी असते आणि जोडीदारास आकर्षित करण्यासाठी तो त्यास फुगवितो. मादी नरापेक्षा किंचित मोठी आहे. फ्रिगेट बर्ड्स समुद्राच्या पृष्ठभागावरून उडणारे मासे खातात. नरांच्या वरच्या पंखांवर फिकट गुलाबी पट्टीदेखील असते. मादीच्या डोळ्याभोवती एक लाल रंगाचे वलय असते. किशोर आणि अपरिपक्व पक्ष्यांना ओळखणे अधिक कठीण आहे. फ्रिगेट पक्षी उडण्यासाठी तयार झालेले असावेत. ते क्वचितच पोहतात आणि कमी चालत असतात. हे पक्षी झाडांमध्ये घरटे बांधतात. झाडे आणि झुडपांभोवती सुरक्षित ठिकाणी पिलांचे संगोपन करतात. ते वजनाने अतिशय हलके असतात.

मराठवाड्यातील पहिलीच नोंद
२१ मे रोजी सकाळी येलदरी धरणाच्या जलाशयात हवेत उडत असताना नेहमीपेक्षा वेगळा पक्षी दिसला. या पक्षाचे त्वरित फोटो घेतले. त्याची अधिक माहिती तपासली असता भारतात या पक्ष्याच्या ई-बर्डनुसार खूप कमी नोंदी आहेत. मराठवाड्यातील ही पहिलीच नोंद असल्याचे गणेश कुरा यांनी सांगितले.

पक्षीमित्रांसाठी पर्वणी
महाराष्ट्रात या समुद्र पक्ष्याच्या ५ ते ६ नोंदी आहेत. तौउते वादळापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी येलदरी जलाशयाच्या परिसरात आला असावा. पक्षीमित्रांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. येलदरी धरण परिसरात नेहमीच नवनवीन पक्षी येत असल्याने पक्षीमित्रांसाठी ही पर्वणी ठरत आहे.
- अनिल उरटवाड, पक्षीमित्र

Web Title: Rare 'little thief' Crow came to Marathwada to escape the onslaught of 'Tauktae ' cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.