३ तास शस्त्रक्रिया, महिलेची १० किलोची गाठ काढली; पतीचे दुर्लक्ष, उपचारासाठी भाऊ धावून आला
By संतोष हिरेमठ | Published: November 9, 2023 05:32 PM2023-11-09T17:32:49+5:302023-11-09T17:33:10+5:30
प्रत्येक गाठ कॅन्सरची नसते; शस्त्रक्रियेच्या दहाव्या दिवशी सुटी
छत्रपती संभाजीनगर : एका महिलेची दुर्मीळ शस्त्रक्रिया करून शासकीय कर्करोग रुग्णालयातील डाॅक्टरांनी तब्बल १० किलो वजनाची गाठ काढली. अवघड जागेतील या गाठीमुळे महिलेला चालणेही अवघड झाले होते. मात्र, शस्त्रक्रियेनंतर दहाव्या दिवशी रुग्णालयांतून तिला सुटी देण्यात आली. विशेष म्हणजे ही गाठ कॅन्सरची नव्हती.
बीड जिल्ह्यातील एका ३२ वर्षीय महिलेवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या महिलेला अवघड जागेत अचानक गाठ वाढण्यास सुरुवात झाली. ही गाठ वाढत वाढत १० किलोची झाली. परिणामी, महिलेला चालणेही अशक्य होऊ लागले. महिलेच्या उपचाराकडे पतीने दुर्लक्ष केले होते. मात्र, बहिणीसाठी भाऊ धावून गेला. कॅन्सरच्या शक्यतेने शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) महिलेला दाखल करण्यात आले. याठिकाणी बायोप्सी करण्यात आली. सुदैवाने ही गाठ कॅन्सरची नसल्याचे निदान झाले. त्यानंतर या महिलेची शस्त्रक्रिया करून गाठ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. स्त्री कर्करोग विभागप्रमुख डाॅ. अर्चना राठोड यांनी ३ तास शस्त्रक्रिया करून ही १० किलोंची गाठ काढली. शस्त्रक्रियेत डाॅ. भक्ती कल्याणकर, डाॅ. संजय पगारे, डाॅ. नरेंद्र पाटील, डाॅ. श्रीकृष्ण चव्हाण, डाॅ. ज्योती कोडगिरे, डाॅ. पल्लवी तिडके, डाॅ. शगुफ्ता फातेमा, भूलतज्ज्ञ डाॅ. रमाकांत आलापुरे, डाॅ. दत्तात्रय गांगुर्डे, परिचारिका श्रद्धा जोशी, प्रियंका बरवे आदींचा सहभाग होता. डाॅ. चैतन्य पाटील यांनी प्लास्टिक सर्जरी केली. अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड, विशेष कार्य अधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष
या महिलेला शस्त्रक्रियेच्या १० व्या दिवशी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. गाठ मोठी होण्यापूर्वीच उपचाराची गरज होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महिलांच्या आरोग्याकडे आजही दुर्लक्ष होते. वेळीच लक्ष दिले तर आजार वेळीच आटोक्यात येतो, असे डाॅक्टरांनी सांगितले.