७१ वर्षांनंतर दुर्मिळ योग, श्रावणाची सुरुवात अन् शेवट सोमवारीच
By प्रशांत तेलवाडकर | Published: August 5, 2024 01:57 PM2024-08-05T13:57:00+5:302024-08-05T13:57:28+5:30
यापूर्वी सोमवार १० ऑगस्ट १९५३ श्रावणाला सुरुवात तर ८ सप्टेंबर १९५३ ला शेवटचा सोमवार आला होता.
छत्रपती संभाजीनगर : देवाधिदेव महादेवाची आराधना भाविक वर्षभर करीत असतात. पण, महादेवाला श्रावण महिना सर्वांत प्रिय मानला जातो. या महिन्यात दर सोमवारी विशेष अभिषेक, पूजा केली जाते. यंदा ७१ वर्षानंतर हा दुर्मीळ योग आला आहे. श्रावणाची सुरुवात व शेवट सोमवारीच होणार आहे.
१९५३ या वर्षी आला होता योग
यंदा श्रावणाला ५ ऑगस्ट सोमवारी सुरुवात झाली आहे तर सांगता २ सप्टेंबर सोमवारी होणार आहे. ३ सप्टेंबरला श्रावण अमावस्या आहे. श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सोमवार येण्याचा हा ७१ वर्षांनंतरचा अतिशय दुर्मीळ योग आहे. यापूर्वी सोमवार १० ऑगस्ट १९५३ श्रावणाला सुरुवात तर ८ सप्टेंबर १९५३ ला शेवटचा सोमवार आला होता.
- वे.शा.सं. सुरेश केदारे गुरुजी
हर हर महादेव जयघोषाने वैद्यनाथ मंदिर परिसर दुमदुमला, पहिल्या श्रावण सोमवारी दर्शनासाठी शिवभक्तांची मंदिरात गर्दी #beed#shravanmaaspic.twitter.com/02hd3G7Ars
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) August 5, 2024
१८ वर्षांनंतर यंदा ५ श्रावणी सोमवार
यंदाच्या श्रावणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ५ श्रावणी सोमवार असणार आहेत. यामुळे भाविकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. या आधी असा योग २००६ यावर्षी आला होता. श्रावण महिन्यात सहसा ४ सोमवार येत असतात. मागील वर्षी २०२३ ला अधिक मासामुळे श्रावण दोन महिने होता. या काळात ८ श्रावणी सोमवार आले होते.
यंदाचे श्रावणी सोमवार
पहिला सोमवार- ५ ऑगस्ट
दुसरा सोमवार- १२ ऑगस्ट
तिसरा सोमवार-१९ ऑगस्ट
चौथा सोमवार २६ ऑगस्ट
पाचवा सोमवार २ सप्टेंबर
आराधनेचा काळ
श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते. महादेवांना समर्पित असणारी विविध व्रतवैकल्ये याच महिन्यात केली जातात. याच श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, विनायक चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, शीतला सप्तमी, दुर्गाष्टमी व कालाष्टमी असे सण-उत्सव आहेत. तर, श्रावणातील मंगळवारी ‘मंगळागौर’ही साजरी करण्यात येणार आहे.