औरंगाबादेत ‘रॅश ड्रायव्हिंग’वाढले; सलग दुसऱ्या दिवशी भरधाव कार वाहतूक बेटाला धडकली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 01:12 PM2022-11-25T13:12:10+5:302022-11-25T13:12:35+5:30
सलग दोन घटनांमध्ये भरधाव कार वाहतूक बेटांना धडकल्या, सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही
औरंगाबाद: अमरप्रीत चौकात बुधवारी रात्री भरधाव वेगाने जाणारी कार बॅरिगेट्स आणि वाहतूक बेटाला धडकल्याची घटना घडल्यानंतर गुरूवारी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास गजानन महाराज मंदिरासमोरील वाहतूक बेटाला वेगाने जाणारी कार धडकली. सलग दुसऱ्या दिवशी ‘रॅश ड्रायव्हिंग’च्या घटना शहरात घडल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री सेव्हन हिल्सकडून सूतगिरणीकडे एक कार ( क्रमांक एमएच-०३, एझेड- ४४०६ ) भरधाव वेगात जात होती. गजाजन महाराज मंदिरासमोरील वाहतूक बेटाला या भरधाव वेगातील कारने धडक दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. कारचालक अपघातानंतर फरार झाला. कारमध्ये कोण होते, चालक मद्यपान केलेला होता की नाही. याची खातरजमा केल्यानंतर पुढील कारवाई होईल, असे घटनास्थळावरील पोलिसांनी सांगितले. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.
सलग दोन घटना
बुधवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान जालना रोडवरील अमरप्रीत चौकात एका भरधाव वेगातील कार रस्त्यावरील बॅरिगेट्स आणि वाहतूक बेटाला धडकल्याची घटना घडली होती. अपघातानंतर कार तेथून निघून गेली. कोणती कार होती? कोणी जखमी झाले का ? याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, बुधवार आणि गुरुवारी सलग दोन दिवस शहरात ‘रॅश ड्रायव्हिंग’च्या घटनेतून मोठे अपघात घडले. तसेच गुरुवारी सकाळी वाळूज येथे भरधाव ट्रकने तिघा भावंडाना चिरडले होते. शहरात अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे नागरीकांमधून चिंता व्यक्त होत आहे.