दिल्लीगेटवर रास्ता रोको : अटक केलेल्या कार्यकर्त्यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात घेतली सभा
By | Published: December 9, 2020 04:00 AM2020-12-09T04:00:06+5:302020-12-09T04:00:06+5:30
अटक करून बेगमपुरा पोलीस ठाण्यात या कार्यकर्त्यांना आणल्यानंतर तेथेच त्यांनी सभा घेतली. त्यात सर्वांनीच केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा ...
अटक करून बेगमपुरा पोलीस ठाण्यात या कार्यकर्त्यांना आणल्यानंतर तेथेच त्यांनी सभा घेतली. त्यात सर्वांनीच केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा समाचार घेतला. आयटक नेते कॉ. राम बाहेती यांनी या सभेचे सूत्रसंचालन केले. हमाल मापाडींचे नेते साथी सुभाष लोमटे यांनी या सभेचा समारोप केला.
भर पोलीस ठाण्यातच झालेल्या सभेत भाषणे तर झालीच; परंतु सावीर वसुधा मधुकर या छोट्या मुलाने क्रांती गीतेही गायली. कॉ. वसुधा कल्याणकर यांनीही क्रांती गीते गाऊन आंदोलक शेतकऱ्यांबद्दल आदर व्यक्त केला.
दुपारी ३ वाजेपर्यंत ही सभा सुरू होती. या सभेत भाकपचे कॉ. अश्फाक सलामी, सिटूचे कॉ. श्रीकांत फोपसे, शेकापचे उमाकांत राठोड, माकपचे भगवान भोजने, ॲड. अभय टाकसाळ, ॲड. रमेश खंडागळे, काँग्रेसचे ॲड. इक्बालसिंग गिल, ॲड. सुभाष देवकर, मुदस्सर अन्सारी, झकिया बेगम आदींनी यावेळी भाषणे करून केंद्र सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. शेवटी भास्कर लहाने यांनी आभार मानले.
रास्ता रोको आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे श्रीरंग ससाणे, शैलेंद्र मिसाळ, संतोष लोखंडे, पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे लता थोरात, सावित्री साळवे, शकील भाई, काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष डॉ. अरुण शिरसाठ, कॉ. सचिन गंडले आदींचा या आंदोलनात सहभाग होता.
आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांच्या हातात लाल बावटे फलक होते. कॉ. बाहेती यांनी ‘आधुनिक वामन्यापासून सावधान’ या आशयाचे फलक हातात धरले होते.
९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयटक कार्यालय, खोकडपुरा येथे पुढील दिशा ठरवण्यासाठी संबंधित सर्व पक्ष संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.