जालना रोडवर चार तास रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 01:03 AM2018-07-31T01:03:28+5:302018-07-31T01:04:55+5:30

आरक्षणासाठी मराठा तरुण प्रमोद पाटील याने रेल्वेसमोर उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे कळताच मुकुंदवाडीतील हजारो नागरिकांनी सोमवारी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली. अनेक मराठा तरुणांनी जालना रोडवर उतरून रास्ता रोको केला

Rasta Roko for four hours on Jalna Road | जालना रोडवर चार तास रास्ता रोको

जालना रोडवर चार तास रास्ता रोको

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आरक्षणासाठी मराठा तरुण प्रमोद पाटील याने रेल्वेसमोर उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे कळताच मुकुंदवाडीतील हजारो नागरिकांनी सोमवारी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली. अनेक मराठा तरुणांनी जालना रोडवर उतरून रास्ता रोको केला. एक बस आणि कचऱ्याच्या ट्रकचीही काच फोडली. सुमारे चार तास सुरू असलेल्या या आंदोलनाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मुकुंदवाडी ठाण्यात जाऊन प्रमोदच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासोबतच अन्य मागण्या मंजूर करीत असल्याचे लेखी आश्वासन दिले.
प्रमोदच्या निधनाचे वृत्त समजताच सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जालना रस्त्यावर लाकडी ओंडके आणि लाकडी दांडे, दगड टाकून रस्ता बंद केला. हजारो लोक रस्त्यावर उतरल्याचे कळताच पोलिसांनी सिडको बसस्थानकाकडून मुकुंदवाडीकडे आणि चिकलठाण्याकडून मुकुंदवाडीकडे जाणारी वाहतूक बंद केली. आंदोलन सुरू झाल्याचे कळताच मराठा समाजाचे हजारो तरुण घोळक्याने जालना रोडवर आले. यात महिलांचाही सहभाग होता. मराठा आरक्षणासाठी आणखी किती बळी घेणार, असा सवाल करीत महिला रस्त्यावर बसल्या होत्या. कार्यकर्ते छत्रपती शिवरायांची छायाचित्रे असलेला भगवा ध्वज घेऊन घोषणाबाजी करीत होते. त्यानंतर आणखी एक मोठा जमाव रस्त्यावर येऊन बसला. यात १६ ते २५ वयोगटातील मुलांची संख्या अधिक होती. ही मुले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अत्यंत घाणेरड्या शिव्या देत होते. कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने चक्का जाम झाले होते. दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. मुकुंदवाडी चौकात सुरू असलेल्या आंदोलनस्थळानजीकच मुकुंदवाडी ठाणे असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तेथे तैनात होता. पोलिसांनी आंदोलन शांततेत होऊ दिले. आंदोलनातील तरुण मुले पोलीस आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर आक्रमकपणे येताना दिसले. मोबाईलमध्ये चित्रण करण्यास ती पोलिसांनाही विरोध करीत. एका पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेऊन त्यातील छायाचित्रे त्यांनी नष्ट करायला लावली.
यावेळी अंबादास दानवे, विनोद पाटील, अभिजित देशमुख, बाबासाहेब डांगे, मोतीलाल जगताप, सुनील जगताप, ज्ञानेश्वर डांगे, बन्सीलाल गांगवे, मनोज गांगवे, सुरेश वाकडे, सुकन्या भोसले, सुनील कोटकर, अ‍ॅड. सुवर्णा मोहिते आदींची उपस्थिती होती.
पोलीस घटनास्थळी
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र गायकवाड, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक नाथा जाधव, पो. नि. एल. ए. सिनगारे, पो. नि. दादासाहेब सिनगारे यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी, क्यूआरटी पथक, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या मुकुंदवाडी ठाण्यात दाखल झाल्या. जिल्हाधिकारी चौधरी हेदेखील मुकुंदवाडी ठाण्यात दाखल झाले. त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले.
या निवेदनात आरक्षणासंबंधी शासनाच्या चालढकल धोरणामुळे प्रमोद पाटील या तरुणाने आपली जीवनयात्रा संपविली. प्रमोद पाटील यांना हुतात्मा म्हणून जाहीर करा, मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, प्रमोद यांच्या कुटुंबियास ५० लाख रुपये मदत करावी आणि एका नातेवाईकाला शासकीय नोकरी द्यावी, आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मेगा भरती स्थगित करावी, मुख्यमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, तसेच प्रमोदच्या नातेवाईकांनी दिलेली तक्रार त्वरित दाखल करून घ्यावी, आदी मागण्या केल्या. या मागण्या मान्य झाल्याशिवाय त्याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या स्तरावरील मागण्या त्वरित मान्य करीत असल्याचे तसेच शासनस्तरावरील मागण्यांसाठी शासनाकडे सकारात्मक पाठपुरावा करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Rasta Roko for four hours on Jalna Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.