चोरीतील सोने स्वत: वितळवून विकायचा राठोड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2017 11:37 PM2017-05-12T23:37:58+5:302017-05-12T23:41:12+5:30
लातूर : गेल्या अनेक दिवसांपासून लातूरकरांची डोकेदुखी ठरलेला राजाभाऊ राठोड हा पहाटेच्यावेळी फिरायला म्हणून घराबाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत पळ काढत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : गेल्या अनेक दिवसांपासून लातूरकरांची डोकेदुखी ठरलेला राजाभाऊ राठोड हा पहाटेच्यावेळी फिरायला म्हणून घराबाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील गंठण, मंगळसूत्र हिसकावत पळ काढत होता. हिसकावलेले गंठण आणि मंगळसूत्र तो स्वत:च्या घरीच वितळवून विकत असल्याचे समोर आले आहे. यासाठी लागणारे साहित्यही त्याने आपल्या घरी ठेवले होते. वेळप्रसंगी वेड्याचे सोंगही घेत होता.
औसा तालुक्यातील उजनी तांडा येथील मूळचा रहिवासी असलेला राजाभाऊ खेमराज राठोड (३३ ह. मु. औसा रिंग रोड, लातूर) हा पहाटे आपल्या पत्नीला व्यायामासाठी जातो, असे सांगून दुचाकीवरुन बाहेर पडायचा. लातूर शहरातील विविध रस्त्यांवर पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडलेल्या महिलांवर पाळत ठेवत पाठीमागून दुचाकीवरुन येत गळ्यातील मंगळसूत्र, गंठण हिसकावत पळ काढायचा. हा खेळ गेल्या अनेक दिवसांपासून तो करीत होता. याबाबत खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. त्यानंतर शिवाजीनगर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने राजाभाऊ राठोडवर पाळत ठेवली. विशेष म्हणजे राठोडचा मोठा भाऊ हा पुण्यात वास्तव्य करतो. तेथे तो कन्स्ट्रक्शन क्षेत्रात असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बरी आहे. या भावाने राजाभाऊला पुण्याला नेले. मात्र, भावाकडे फार दिवस तो राहिला नाही. पुन्हा लातुरात आलेल्या राजाभाऊने महिलांना लुटण्याचे, गंठण, मंगळसूत्र पळविण्याचा उद्योग सुरु केला. अतिशय चालाखपणे आणि सराईतपणे तो हे काम करीत होता. पोलिसांना अनेक दिवसांपासून चकमा देत त्याने चोऱ्या केल्या.