सिग्मा हॉस्पिटलला ‘एनएबीएच’चे मानांकन
By Admin | Published: September 24, 2016 12:22 AM2016-09-24T00:22:12+5:302016-09-24T00:26:58+5:30
औरंगाबाद : शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलने भारतातील सर्वोत्तम असे ‘नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अॅण्ड हेल्थके अर प्रोव्हाईडर्स’ (एन.ए.बी.एच.) हे मानांकन प्राप्त केले आहे.
औरंगाबाद : शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलने भारतातील सर्वोत्तम असे ‘नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अॅण्ड हेल्थके अर प्रोव्हाईडर्स’ (एन.ए.बी.एच.) हे मानांकन प्राप्त केले आहे. अशा प्रकारे मानांकितप्राप्त युनायटेड सिग्मा हॉस्पिटल हे मराठवाडातील पहिले रुग्णालय ठरले आहे, अशी माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत हॉस्पिटलचे सीएमडी डॉ. उन्मष टाकळकर आणि सीईओ डॉ. अजय रोटे यांनी दिली.
‘एनएबीएच’ ही संस्था केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील ‘क्वालिटी काऊंसिल आॅफ इंडिया’चा एक भाग आहे. या मानांकनाचा अर्थ म्हणजे रुग्णसेवेची गुणवत्ता व रुग्णांची सुरक्षितता असा आहे. परदेशातून भारतात येऊ इच्छिणारे (मेडिकल टूरिझम) सर्वप्रथम ‘एनएबीएच’ मानांकन असलेल्या रुग्णालयांना प्राधान्य देतात. या मानांकनाचे निकष व मापदंड अत्यंत कठीण असून संपूर्ण रु ग्णालयातील व्यक्तींचा त्यामध्ये सहभाग असणे क्रमप्राप्त ठरते. युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमधील सर्वांच्या एकत्रित व अथक प्रयत्नांनी २ वर्षांपेक्षा अधिक काळ परिश्रम घेऊन हे मानांकन मिळविले. ७ सप्टेंबरपासून पुढील तीन वर्षांसाठी हे मानांकन मिळालेले असून मराठवाड्यातील आणखी काही रुग्णालयांना हे मानांकन मिळाल्यास मेडिकल टूरिझम वाढेल, असे डॉ. उन्मेष टाकळकर म्हणाले.
या मानांकनामुळे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये सर्वोत्तम रुग्णसेवा प्राप्त होईल. महाराष्ट्रात अवघ्या ४४ रुग्णालयांना हे मानांकन मिळालेले आहे. त्यामुळे गुणवत्तेची चळवळ सुरू होण्याची गरज असून अन्य रुग्णालयांना हे मानांकन प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षण केंद्राद्वारे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे डॉ. अजय रोटे यांनी सांगितले.
अवयवदानाला गती
युनायटेड सिग्मा हॉस्पिटलच्या पुढाकाराने अवयवदानाची चळवळ सुरू झाली. विभागातील पहिले अवयवदान या हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. यातील पुढचा टप्पा म्हणून लवकरच हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर ब्रेनडेड व्यक्तीचे अवयवदान करताना हृदय प्रत्यारोपणासाठी अन्य शहरांत जाण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे औरंगाबाद शहरातील वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने हे मोठे पाऊल ठरेल.