शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित

By Admin | Published: June 10, 2014 12:28 AM2014-06-10T00:28:46+5:302014-06-10T00:33:37+5:30

कडा: आष्टी तालुक्यातील अनेक ठिकाणी शिधापत्रिकाधारकांना वेळेवर व पुरेसे धान्य मिळत नाही. यामुळे शिधापत्रिकाधारकांना हक्काच्या धान्यापासून वंचित रहावे लागते.

Ration card holder deprived of grain | शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित

शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित

googlenewsNext

कडा: आष्टी तालुक्यातील अनेक ठिकाणी शिधापत्रिकाधारकांना वेळेवर व पुरेसे धान्य मिळत नाही. यामुळे शिधापत्रिकाधारकांना हक्काच्या धान्यापासून वंचित रहावे लागते. या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर धान्याचा काळाबाजार होत असल्याचा आरोप शिधापत्रिकाधारकातून होत आहे.
आष्टी तालुक्यात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना पिवळ्या शिधापत्रिका देण्यात आल्या आहेत. या कुटुंबियांना अल्प किमतीत गहू, तांदूळ हे धान्य देण्यात येते. धान्यापासून कोणीही वंचित राहू नये, योग्य किमतीत धान्य मिळावे, शिधापत्रिकाधारकांना वेळेवर धान्य मिळावे व धान्याचा काळा बाजार होऊ नये, यासाठी वरिष्ठांकडून सातत्याने सूचना देण्यात येतात. असे असले तरी तालुक्यात सध्या धान्य वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.
अनेक ठिकाणी शिधापत्रिकाधारकांना वेळेवर धान्य मिळत नाही. धान्याची चढ्या दराने विक्री होते. कार्डधारकांना पुरेसे धान्य मिळत नाही, असे प्रकार तालुक्यात सर्रास होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी केला आहे. अनेक ठिकाणी धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी कार्डधारकातून केल्या जातात. मात्र संबंधित दुकानदारांना पुरवठा विभागाचा वरदहस्त असल्याने केवळ कागदी घोडे नाचविले जात असल्याचेही जगताप यांनी सांगितले.
तालुक्यातील दौला वडगाव हे आठ हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावाजवळ काही वाड्या व वस्त्या आहेत. या ठिकाणच्या सर्व ग्रामस्थांना धान्य मिळावे यासाठी तीन दुकाने उघडली आहेत. असे असले तरी या दुकानातून मिळणारे धान्य शिधापत्रिका धारकांना मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थातून होत आहे. यामुळे शिधापत्रिकाधारकांना नाईलाजाने खुल्या बाजारातून चढ्या किमतीने धान्य खरेदी करावे लागत असल्याचे बाळासाहेब कोटक यांनी सांगितले. तसेच येथील काही दुकानदार कार्डधारकांना अपमानास्पद वागणूक देतात. अनेकदा पुरेसे धान्यही दिले जात नसल्याचा आरोप शिधापत्रिकाधारकातून होत आहे. यामुळे सदरील दुकानदारांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी आयुब खान, महादेव थोरात, सोमनाथ भापकर, नाना जाधव, संभाजी मगर, अण्णा पिसोरे, रामदास पिसोरे यांच्यासह इतर शिधापत्रिका धारकांनी केली आहे.
या संदर्भात आष्टी येथील तहसीलदार राजीव शिंदे म्हणाले की, तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची वेळोवेळी तपासणी करण्यात येत आहे. शिधापत्रिकांना धान्य मिळते का नाही याचीही शहानिशा करण्यात येत आहे. लाभार्थ्यांना वेळेवर धान्य मिळावे यासाठी पुरवठा विभाग योग्य ती काळजी घेत आहे. या उपरही लाभार्थ्यांना धान्य मिळाले नसल्याच्या तक्रारी आल्यास तेथे चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.

Web Title: Ration card holder deprived of grain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.