किराणा दुकानांपेक्षा रेशनची डाळ महाग
By Admin | Published: August 26, 2016 12:13 AM2016-08-26T00:13:40+5:302016-08-26T00:52:26+5:30
बीड : यावर्षीपासून स्वस्त धान्य दुकानांवर गोरगरिबांसाठी डाळ देऊ केली आहे; मात्र किराणा दुकानांपेक्षा आठ रुपये जादा दाराने रेशन कार्डधारकांना डाळ विकत घ्यावी लागणार आहे.
बीड : यावर्षीपासून स्वस्त धान्य दुकानांवर गोरगरिबांसाठी डाळ देऊ केली आहे; मात्र किराणा दुकानांपेक्षा आठ रुपये जादा दाराने रेशन कार्डधारकांना डाळ विकत घ्यावी लागणार आहे. यामुळे रेशन दुकानदार गोदामातून माल उचलताना डाळ नको, असे म्हणत आहेत; परंतु जिल्हा पुरवठा विभागाने रेशन दुकानदारांना इतर धान्यांबरोबर डाळ घेणे अनिवार्य केले आहे.
सध्या सणासुदीचे दिवस आहेत. गोरगरिबांचे सण गोड व्हावेत या उद्देशाने शासन स्वस्त धान्य दुकानांमार्फत धान्य पुरवठा करते. मात्र, यावेळी शासनाने दिलेली डाळ किराणा दुकानापेक्षा जास्त भावाने गोरगरिबांना घ्यावी लागत आहे. या प्रकारामुळे स्वस्त धान्य दुकानांच्या उद्देशाला शासनाने हरताळ फासला असल्याने तक्रार तरी करायची कुणाकडे, असा प्रश्न जिल्ह्यातील हजारो रेशन कार्डधारकांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यात दोन हजारांवर स्वस्त धान्य दुकाने असून, सद्यस्थितीत सहा हजार क्विंटल डाळ आली आहे. स्वस्त धान्य दुकानदार डाळ स्वीकारण्यास नकार देत असल्याने अधिकाऱ्यांनाच पंचायत पडली आहे. यावर तोडगा म्हणून प्रत्येक दुकानदाराला गहू, साखर, तांदूळ याबरोबरच डाळ घेणे अनिवार्य केले आहे. स्वस्त धान्य महाग झाल्याने ऐन सणासुदीत गोरगरीबांच्या खिशाला कात्री बसणार आहे. यामुळे गोरगरीब नागरिक चिंतेत आहेत. (प्रतिनिधी)