रेशन दुकान होणार कॅशलेस..!
By Admin | Published: January 1, 2017 11:55 PM2017-01-01T23:55:33+5:302017-01-01T23:56:27+5:30
जालना : सार्वजनिक वितरण व्यवस्था ‘कॅशलेस’ करण्यात येत आहे.
जालना : नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराला गती देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून, त्यादृष्टिने जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्था ‘कॅशलेस’ करण्यात येत आहे. जिल्ह्यातील दोन स्वस्त धान्य दुकानांची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन या आठवड्यात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
अर्थव्यवस्थेला रोखरहित (कॅशलेस) करण्यासाठी डिजीटल पद्धतीचा वापर करून हा व्यवहार करण्यास प्रोत्साहन देण्यात येते आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे हा कॅशलेस व्यवहार करण्याकडे भर दिला जात आहे. जिल्ह्यात एकूण १२८५ स्वस्त धान्य दुकान आहेत. या दुकानांतून धान्य वितरण ‘पॉस’ (पॉइंट आॅफ सेलिंग) मशीनद्वारे करण्याची तयारी करण्यात आलेली आहे. कॅशलेस व्यवहारांसंबधी आधार कार्डद्वारे बायोमेट्रीक पद्धतीने धान्य वितरण करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व दुकानदार, रॉकेल विक्रेते यांची दोन दिवस कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेस दुकानदारांनी सहभाग नोंदवून कॅशलेस व्यवहाराची माहिती जाणून घेतली. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व दुकानदारांना ‘पॉस’मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी मशीनची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. महिनाभरात या मशीन सर्व दुकानदारांना देण्यात येतील, असा विश्वास जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी व्यक्त केला. प्रायोगिक तत्वावर जालना तालुक्यातील वझर येथील रंगनाथ भिमराव नागरे व वैशाली ग्राहक सोसायटी या दोन दुकानांची निवड करण्यात आली आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.