रेशनिंग पारदर्शकता २८ दुकानांपुरतीच
By Admin | Published: November 25, 2014 12:46 AM2014-11-25T00:46:27+5:302014-11-25T01:00:57+5:30
सुनील कच्छवे , औरंगाबाद रेशन दुकानांवरील अन्नधान्याचा आणि साखरेचा काळाबाजार थांबवून त्यात पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दीड वर्षापूर्वी गाजावाजा करून
सुनील कच्छवे , औरंगाबाद
रेशन दुकानांवरील अन्नधान्याचा आणि साखरेचा काळाबाजार थांबवून त्यात पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दीड वर्षापूर्वी गाजावाजा करून बायोमेट्रिक पद्धत आणली. मात्र, आतापर्यंत फक्त २८ दुकानांवरच ही पद्धत लागू होऊ शकली आहे. जिल्ह्यातील रेशन दुकानांच्या तुलनेत ही संख्या दोन टक्क्यांपेक्षाही कमी आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सर्व रेशन दुकानांवर बायोमेट्रिक पद्धत लागू करण्याची घोषणा घोषणाच ठरली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात १७१७ स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानांवरून दरमहा लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात गहू, तांदूळ, साखर तसेच केरोसीन दिले जाते. मात्र, बऱ्याच वेळा संपूर्ण कोटा उचलूनही अनेक रेशन दुकानदार लाभार्थ्यांना त्याचे वाटप करीत नाहीत आणि त्यानंतर तो कोटा बाजारभावाने विक्री करतात. त्यामुळे काळाबाजार थांबवून खऱ्या लाभार्थ्यांना अन्नधान्य आणि साखर व केरोसीन मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने दीड वर्षापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर बायोमेट्रिक पद्धत आणली. सुरुवातीला शहरातील ९ दुकानांवर ही पद्धत लागू केली गेली. या नऊ दुकानचालकांवर प्रत्येकी एक बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आले, तसेच दुकानचालकांना टॅब्लेटचे वाटप केले. या टॅब्लेटमध्ये लाभार्थ्यांची सर्व माहिती, त्यांचे छायाचित्र आणि बोटांचे ठसे साठविले गेले. लाभार्थी दुकानावर आल्यानंतर आधी बायोमेट्रिक मशीनवर त्याच्या बोटाचे ठसे जुळवून मगच त्याला अन्नधान्य देण्याची तरतूद यात आहे. दुकानावरील टॅब्लेट आॅनलाईन पद्धतीने मुंबई येथील सर्व्हरला जोडण्यात आलेले आहे. त्यामुळे दिवसभरात किती लाभार्थ्यांनी धान्य नेले, कोणत्या लाभार्थ्यांनी नेले याचे रेकॉर्ड दरमिनिटाला अद्ययावत होते. परिणामी, उरलेले धान्य परत करण्याशिवाय दुकानदाराला पर्याय नाही.
या पद्धतीने शहरातील नऊही दुकानांवर कधी नव्हे ते दर महिन्याला काही धान्य आणि केरोसीन शिल्लक राहिल्याचे सुरुवातीलाच आढळून आले. त्यानंतर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी ग्रामीण भागातील आणखी काही दुकानांवर ही पद्धत लागू केली. तसेच हळूहळू जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांवर बायोमेट्रिक पद्धत लागू केली जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, आता दीड वर्ष उलटले तरी ही पद्धत २८ दुकानांपुरतीच मर्यादित राहिली आहे. जिल्ह्यातील अजूनही १६८९ दुकानांवर जुन्याच पद्धतीने धान्य वाटप सुरू आहे. ४
जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर यांना याविषयी विचारले असता ते म्हणाले, सध्या
२८ दुकानांवर बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वाटप केले जात आहे. जिल्ह्यातील उर्वरित दुकानांवरही ही पद्धत लागू करायची आहे.
४सध्या प्रत्येक दुकानावर एक बायोमेट्रिक मशीन आणि एक टॅब्लेट दिलेले आहे. हे दोन्ही एकमेकांना जोडावे लागतात. मात्र, लवकरच टॅब्लेटमध्येच बायोमेट्रिक असलेले मशीन येणार आहे. हे मशीन आले की सर्वत्र त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.