फटाक्यांच्या आतषबाजीत रावणदहन

By Admin | Published: October 12, 2016 12:47 AM2016-10-12T00:47:28+5:302016-10-12T01:16:35+5:30

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिकनगरीतील बजाजनगरात मंगळवारी विजयादशमीच्या सायंकाळी दिमाखदार सोहळ्यात आकाशात आकर्षक

Ravana Dahan in fireworks fireworks | फटाक्यांच्या आतषबाजीत रावणदहन

फटाक्यांच्या आतषबाजीत रावणदहन

googlenewsNext


वाळूज महानगर : वाळूज औद्योगिकनगरीतील बजाजनगरात मंगळवारी विजयादशमीच्या सायंकाळी दिमाखदार सोहळ्यात आकाशात आकर्षक सप्तरंगी फटाक्यांची आतषबाजी व ‘जय श्रीराम’च्या गगनभेदी घोषणात ८१ फुटी रावणाच्या पुतळ्याचे जल्लोषात दहन करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील हजारो आबालवृद्ध व भाविकानी या नेत्रदीपक सोहळ्याला गर्दी केली होती.
बजाजनगरातील श्रीराम जानकी ट्रस्टतर्फे दोन दशकांपासून दसरा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी आठवडाभरापासून उत्तर प्रदेशातून आलेले कलावंत रामलीला सादर करीत असून रामलीला पाहण्यासाठी दररोज भाविकांची अलोट गर्दी उसळते आहे. मंगळवारी विजयादशमीनिमित्त रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रावणाचा पुतळा तयार करण्यासाठी खास उत्तर प्रदेशातून आलेले मुस्लिम कलावंत चाँदभाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपार मेहनत घेऊन भव्य असा रावणाचा ८१ फुटी पुतळा तयार केला होता. रावणदहन कार्यक्रमाला बजाजनगर, वडगाव, करोडी, तीसगाव, पंढरपूर, वळदगाव, पाटोदा, वाळूज, गोलवाडी व परिसरातून मोठ्या प्रमाणात महिला, तरुण-तरुणी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास श्री राम जानकी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आर.के.सिंह, पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, डॉ. सुभाष माने, संजय जेजुरीकर, अशोक देवासी, मनोज तिवारी, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक नाथा जाधव, वाहतूक शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे, जि.प.सदस्य अनिल चोरडिया, नगरसेवक सिद्धांत सिरसाठ, पुजारी राजेश्वरानंद पांडे आदींच्या उपस्थितीत रावण प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांनी रावणाच्या नाभीत बाण मारून आग लावली. बाण मारताच रावणाच्या पुतळ्याने क्षणार्धात पेट घेतला. याचप्रसंगी रावणासोबतच तयार करण्यात आलेल्या कुंभकर्ण, मेघनाद यांच्या पुतळ्याचे फटाक्यांच्या आतषबाजीत दहन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित भाविकांनी जय श्रीरामाच्या गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. बजाजनगरातील रामलीला मैदान गर्दीने फुलून गेले होते. रावणदहनाच्या आरंभी आकाशात रंग-बेरंगी फटाक्यांची आकर्षक आतषबाजी करण्यात आली होती.

Web Title: Ravana Dahan in fireworks fireworks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.