बीबी का मकबरा परिसरात पुन्हा उत्खनन सुरू; अवशेषांचे रहस्य उलगडणार
By संतोष हिरेमठ | Published: February 14, 2024 07:44 PM2024-02-14T19:44:22+5:302024-02-14T19:44:38+5:30
बीबी का मकबरा परिसरात यापूर्वी दोन वेळा खोदकाम करण्यात आले. येथे पुरातत्त्व अवशेष सापडले.
छत्रपती संभाजीनगर : बीबी का मकबरा परिसरात नेमके काय दडले आहे, याचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा उत्खनन सुरू करण्यात आले आहे. या उत्खननातून या जागेच्या इतिहासाचे आणि येथील अवशेषांचे काळाच्या उदरात गडप झालेले रहस्य उलगडण्याची अपेक्षा आहे.
बीबी का मकबरा परिसरात यापूर्वी दोन वेळा खोदकाम करण्यात आले. येथे पुरातत्त्व अवशेष सापडले. परंतु, काम अर्धवट राहिल्याने सापडलेला इतिहास पुन्हा मातीत हरविल्याची परिस्थिती बनली. याविषयी ‘लोकमत’ने १४ डिसेंबर २०२३ रोजी ‘अर्धवट उत्खनन करा अन् नंतर विसरा, सापडलेल्या इतिहासाला पुन्हा मूठमाती’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. अखेर पुरातत्त्व सर्वेक्षणने या ठिकाणी पुन्हा उत्खननाचे काम हाती घेतले.
यापूर्वी कधी खोदकाम?
- २००५ ते २००९ या कालावधीतील अधीक्षकांनी बीबी का मकबऱ्यासमोरील जागेत काही पुरातत्त्व अवशेष असल्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून खोदकाम करण्यात आले.
- १४ सप्टेंबर २०२१ रोजी मकबऱ्यासमोरील उजव्या बाजूला असलेल्या उंचवट्यावर ४० मीटर बाय ४० मीटर परिसरात उत्खनन करण्यात आले होते.
- फेब्रुवारी २०२३ मध्ये या ठिकाणी पुन्हा उत्खनन सुरू करण्यात आले. परंतु काही दिवसांत हे कामही थांबले.
आतापर्यंत उत्खननात काय सापडले?
चार ते सहा फूट खोलपर्यंत उत्खनन करून मलबा हटविण्यात आला. तेव्हा विटा, चुना, दगडी मध्ययुगीन बांधकामाचे अवशेष उघडे पडले. या ठिकाणी मकबरा बांधकाम काळातील स्नानगृह, शौचालयासारखा दगडी, चुन्याचे बांधकाम असलेला पाया इ. अवशेष आढळले. आता उत्खननातून आणखी उलगडा होईल.
किमान १५ दिवस लागतील
या ठिकाणी नेमके काय आहे, हे स्पष्ट होण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागेल.
- डाॅ. शिव कुमार भगत, अधीक्षक (अधीक्षण पुरातत्त्वविद), भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण