...अन पुन्हा उजळला दख्खन का ताज 'बीबी का मकबरा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 07:51 PM2022-01-25T19:51:52+5:302022-01-25T19:53:07+5:30
पुरातत्त्व सर्वेक्षणकडून मुख्य घुमटासह प्रवेशद्वाराचे वैज्ञानिक संवर्धन, चित्र, नक्षिकामाचे संवर्धन अंतिम टप्प्यात
- योगेश पायघन
औरंगाबाद ः दख्खन का ताज म्हणून जगद्विख्यात असलेल्या बीबी का मकबऱ्याचा काळवंडलेला मुख्य घुमट वैज्ञानिक संवर्धनाने उजळला आहे. तर मुख्य प्रवेशद्वार, भिंतीवरील चित्र संवर्धन पर्यटकांना आकर्षणाचे केंद्र बनले आहे. सात महिन्यांपासून सुरू असलेले संवर्धनाचे काम पूर्ण होत आल्याचे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणकडून सांगण्यात आले.
‘लोकमत’ने याबाबत वृत्त देऊन संवर्धनाकडे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणकडून जून २०२१ मध्ये माॅडेलर मनोज सोनवणे यांच्यासह तज्ज्ञ, कारागीर यांनी मकबऱ्याचा मुख्य घुमट, संगमरवरी जाळ्या, प्रवेशद्वाराच्या वैज्ञानिक संवर्धनाचे काम हाती घेत पूर्ण केले. त्याशिवाय मुख्य प्रवेशद्वाराच्या भिंती, आतील नक्षीकाम असलेला भव्य घुमटाची साफसफाई करून वातावरणाने खराब झालेले नक्षिकामाचे वैज्ञानिक संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याशिवाय परिसरात पक्ष्यांना रोखण्यासाठी जाळ्या लावण्यासह दगडी फ्लोरिंग दुरुस्तीचे कामही सध्या सुरू आहे.
घृष्णेश्वर मंदिरातील काजळी काढली
वेरूळ येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिरातील गाभारा, अंतराळ, अर्धमंडपाची स्वच्छता करून काळजी काढल्याने मंदिर आतून उजळून निघाले आहे. पितळखोरा लेणी, मकबऱ्याच्या परिसरातील मशीद, वास्तू संग्रहालय, ग्रंथालयाच्या इमारतींचेही संवर्धन करण्याची मागणी इतिहासप्रेमींतून होत आहे.
माॅडेलर, फोटोग्राफर गेल्यावर संवर्धन कसे होणार ?
पश्चिम क्षेत्रांतर्गत महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांतील रासायनिक संवर्धनाचे काम औरंगाबाद मंडळाच्या कार्यालयातून सुरू होते. तुटपुंज्या मनुष्यबळावर हे काम सुरू होते. आता नव्याने कार्यालयाची संरचना झाल्याने पश्चिम क्षेत्राचे औरंगाबाद, नागपूर मंडळ आणि मुंबई असे दोन भाग झाले. येथील माॅडेलर, फोटोग्राफर या संवर्धनातील महत्त्वाच्या कलाकारांची पदे इतर विभाग हलविण्यात आली. त्यामुळे येथील शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धनाचे भविष्यातील कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे
काळवंडलेल्या मार्बलच्या सफाईसाठी ट्रीटमेंट
प्रवेशद्वारावरील चित्रांचे संवर्धन आणि घुमटाचे, काळवंडलेल्या मार्बलच्या सफाईसाठी आवश्यक ट्रीटमेंट करण्यात आले. प्रवेशद्वाराच्या संवर्धनाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. घृष्णेश्वर मंदिराच्या स्वच्छतेचे, वैज्ञानिक संवर्धनाचे काम पूर्ण झाले असून, आता नागपूरजवळ मनसर येथील स्मारकाचे संरक्षक कोटिंगचे काम हाती घेण्यात येणार आहे.
- श्रीकांत मिश्रा, पश्चिम क्षेत्र उपअधीक्षक, रसायन शाखा, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, औरंगाबाद मंडळ